उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात 13 रोजी तीन सभा
माजी आमदार परशुराम उपरकरांची माहिती
कणकवली / प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ नोव्हेंबर रोजी तीन जाहीर सभा होणार आहेत. सावंतवाडी, कणकवली आणि नंतर मालवण येथे या सभा होतील, अशी माहिती उबाठा पक्षाचे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
येथील 'विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले ठाकरे हे सकाळी ११.३० वा. सावंतवाडी येथील गांधी चौकात महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा घेतील. त्यानंतर दुपारी २.३० वा. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे
जिल्ह्यात खासदार संजय राऊत् सुषमा अंधारे, युवा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्याही सभा टप्प्याटप्याने होणार आहेत. मात्र, त्यांच्या तारखा अद्याप निश्चित व्हायच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील तीनही जागांवर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह आला आहे. सर्व कार्यकर्ते गावागावात जोमाने प्रचाराला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहनही उपरकर यांनी केले.