For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला!

01:37 PM May 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
Advertisement

मुंबईतील 6, नाशिक दिंडोरीत 3 तर धुळेत 3 जागांचा समावेश

मुंबई :प्रतिनिधी

राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील 13 जागांसाठी आज सोमवार 20 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील 6 , ठाणे ,पालघर , भिवंडी आणि कल्याण या 4 जागा आणि नाशिक ,दिंडोरी आणि धुळे या 3 जागा अशा 13 जागांसाठी आज मतदान होत असून 13 पैकी 6 जागांवर शिवसेना विरूध्द शिवसेना अशी थेट लढत होत आहे. यामुळे आजचे मतदान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.

Advertisement

शिवसेनेची पहिली सत्ता ठाणे महापालिकेत आली होती. त्यानंतर मुंबईवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते, आता मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर तसेच पक्षाचे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. आजच्या निवडणूकीत शिवसेना कोणाची याचा निर्णय मतदार घेणार आहेत.

13 जागांवरील लढती
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरूध्द यामिनी जाधव
सलग दोन टर्म खासदार राहीलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा निवडणूक रींगणात असुन त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव या निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई विरूध्द राहुल शेवाळे
दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून 10 वर्षे खासदार राहीलेले शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरूध्द शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होणार आहे.

उत्तर मुंबईत भाजप विरूध्द काँग्रेस
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो ,येथुन भाजपने गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली, गोयल यांच्याविरोधात काँग्रेसने शेवटच्याक्षणी भूषण पाटील असुन ,भाजप विरूध्द काँग्रेस याच्यात थेट लढत आहे.

उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम यांच्या इंन्ट्रीने चुरस
उत्तर मध्य मुंबईत भाजपने प्रसिध्द वकील अॅङ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने येथील लढत चुरशीची झाली असुन, निकम यांच्याविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

वायव्य मुंबईत अमोल किर्तीकर विरूध्द रवींद्र वायकर
वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन दोन्ही शिवसेनेत लढत होत असुन, विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना उमेदवारी नाकारत शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली असुन, किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, गजानन किर्तीकर यांनी मात्र या निवडणूकीत मुलाच्या विरोधात प्रचार केल्याने बाप आणि लेकामध्ये ही लढत होत आहे.

ईशान्य मुंबईत शिवसेना विरूध्द भाजप
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन भाजपचे मिहीर कोटेचा विरूध्द शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होत असुन, गुजराती विरूध्द मराठी असा सामना होत असुन मराठी मतांचे धुवीकरण झाल्यास येथे शिवसेना उमेदवाराला फायदा होऊ शकतो, तसेच मुस्लिम मतही निर्णायक ठरणार आहेत.

ठाण्यात शिवसेना कोणाची
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो,विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे विरूध्द शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत होत असुन,भाजपच्या येथील आमदारांनी म्हस्के यांच्या उमेदवारी विरोधात व्यक्त केलेली नाराजी तसेच विचारे शिवसेनेशी एकनिष्ठ राहील्याने जुन्या शिवसैनिकांचे समर्थन आणि काँग्रेस -राष्ट्रवादीची विचारे यांना किती साथ मिळते यावर ठाण्यात कोणाची शिवसेना हे ठरणार आहे.

कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुलाची प्रतिष्ठा पणाला
कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाकडुन लढत असुन त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली असुन,मनसे आणि भाजपची डॉ.शिंदे यांना किती साथ मिळते यावर ही लढत अवलंबुन असणार आहे.

भिवंडीत राष्ट्रवादी विरूध्द भाजप
राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली महानगरातील एकमेव जागा म्हणजे भिवंडी लोकसभा मतदार संघ, या मतदार संघातुन भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील असुन त्यांच्या विरोधात कपिल पाटील यांचे प्रतिस्पर्धी सुरेश म्हात्रे हे निवडणूक लढत असुन,या मतदार संघातील मुस्लिम आणि अगारी समाजाची मते कोणाला मिळणार यावर येथील खासदार ठरणार आहे.

पालघरमध्ये तिरंगी लढत
बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या पालघर या अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या लोकसभा मतदार संघातुन भाजपने शेवटच्या क्षणी डॉ.हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे,तर शिवसेना ठाकरे गटाने भारती कामडी या महिलेला संधी दिली असुन 6 पैकी 3 आमदार असलेल्या बविआने राजेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.

धुळ्यात दोन डॉक्टरमध्ये लढत
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ लढत आहे. विशेष म्हणजे दोघांनाही पक्षांतर्गत गटबाजी सामना करावा लागत आहे.

नाशिकमध्ये शिवसेना विरूध्द शिवसेना
नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडुन शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यात मुख्य लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि अपक्ष शांतिगिरी महाराज हे ही रींगणात असल्याने मतांच्या विभाजनावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

दिंडोरीत भारती पवार विरूध्द भास्कर भगरे
विद्यमान पेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपकडून महायुतीच्या उमेदवार असुन हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे हे उमेदवार आहेत.दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आदिवासी समाजाचे मतदान हे नेहमी निर्णायक ठरले आहे.

Advertisement
Tags :

.