For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धवाला भगवंतांबद्दल कृतज्ञता वाटू लागली

06:30 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
उद्धवाला भगवंतांबद्दल कृतज्ञता वाटू लागली
Advertisement

अध्याय एकोणतीसावा

Advertisement

श्रीकृष्णांनी भक्तीचे महात्म्य अत्यंत प्रेमाने उद्धवाला सांगितले. समारोप करताना ते म्हणाले, अनन्यभक्ति करण्यामध्ये जे सुख आहे ना, त्यापेक्षा कोणतेच सुख मोठे नाही. हे सर्व सारांचे सार असून सुरवरादिक सगळ्यांच्यासाठी माझी भक्ती  करण्यासारखे अन्य कोणतेच मोठे साधन नाही. भगवंतांचे बोलणे उद्धवाने मन लावून ऐकले. ते ऐकताना उद्धवाचे मन द्रवले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. सर्व शरीर रोमांचित होऊन चित्त आनंदाने विभोर झाले. उत्सुकतेने तो स्वानंदी समरस झाला. देही असून विदेही अशी त्याची अवस्था झाली. आता मिळवायचे असे काही राहिलेच नाही असे त्याला वाटू लागले.

भगवंतांनी सांगितलेल्या भक्तिमहात्म्याशी एकरूप झाल्याने उद्धवाचे उद्धवपण मावळले. तो त्याची देहावस्था जरी विसरला असला तरी प्रारब्धाने त्याला भानावर आणले कारण त्याने अजून जीवनमुक्तीच्या सुखाचा आनंद उपभोगायचा होता. भगवंतांशी एकरूप होण्यापूर्वी भक्ताने आजवर मी सत्कर्म करतोय अशा भावनेने केलेल्या सत्कर्माचा परिणाम म्हणून त्यालाही जीवन्मुक्तावस्था लाभलेली असते.

Advertisement

अर्थातच त्याने ही सत्कर्मे मी कर्ता आहे ह्या भावनेने केलेली असल्याने त्यातून मिळणाऱ्या सुखाचा उपभोग घेतल्याशिवाय त्याची सुटका होत नाही. त्यामुळे प्रारब्धानुसार हा सुखोपभोग घेतल्यावरच म्हणजे जीवन्मुक्तावस्थेचा आनंद घेतल्यावरच त्याचा प्रारब्धभोग संपणार असतो. भानावर आलेल्या उद्धवाने अत्यंत धैर्याने स्वत:ला सावरले आणि भगवंतांच्याबद्दल आलेले प्रेमाचे भरते आवरून धरले. त्याचबरोबर आपण कृतकृत्य झालो. मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक झाले हेही त्याच्या लक्षात आले. भगवंतांनी आपला उद्धार केला हे पाहून त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता दाटून आली. त्यांचा मी कसा उतराई होईन ह्याबद्दल त्याच्या मनात विचार येऊ लागले. गुरुदक्षिणा म्हणून काय दिले म्हणजे त्यांच्या उपकाराची थोडीतरी परतफेड होईल ह्यावर तो चिंतन करू लागला. सद्गुरूंना भेट द्यायसाठी त्याने अनेक गोष्टींचा विचार केला पण अमुक एक गोष्ट गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरूंना द्यावी ह्यावर त्याच्या मनाचा निश्चय होईना कारण ज्या ज्या गोष्टीचा तो विचार करू लागला तो तो त्याच्या लक्षात येऊ लागले की, कोणतीही वस्तू समाधानकारक नसून आपले सद्गुरू तर पूर्ण समाधान मूर्ती आहेत.

भेट वस्तूबाबत त्याच्या मनात असे विचार आले की, सद्गुरूंना चिंतामणी द्यावा तर चिंतन केलेली वस्तू तो देतो खरा पण ती वस्तू मिळाल्यावर त्यातूनच आणखी वस्तू मिळाव्यात अशी इच्छा निर्माण होऊन त्याबद्दल चिंतन सुरू होते. अशी वस्तू जर सद्गुरूंना दिली त्यातून त्यांच्या उपकारातून मुक्त होणे तर दूरच उलट त्यांनाच नसत्या चिंतेत अडकवल्यासारखे होईल. सद्गुरूंना कल्पवृक्ष द्यावा असा विचार केला तर तो कल्पिलेली वस्तू देईल परंतु त्यातून अनेक कल्पना वाढून सगळाच घोटाळा होईल. सद्गुरूंनी तर आपल्याला निर्विकल्प हो असे सांगितले आहे आणि आपणच दिलेल्या वस्तूतून त्यांच्या कल्पना वाढवल्यासारखे होईल. अशी व्यवस्था केल्यास मी केलेल्या उपकारांची फेड अपकाराने करतोस का असे ते विचारतील.

उध्दवाचे विचारचक्र पुढे सुरू झाले. सद्गुरूंना लोखंडाचे सोने करणारा पारसमणी म्हणजे परीस द्यावा तर सद्गुरूंच्या चरणांना ब्रह्मत्वाने स्पर्श केला असल्याने त्यांना पारसमण्याचे काय कौतुक तेव्हा पारसमणी देऊन त्यांचे उपकार कदापि फिटणार नाहीत. सद्गुरूंना कामधेनु द्यावी तर तिने एक इच्छा पुरी केली की, त्यातून नवीन इच्छा तयार होते आणि त्यामुळे कामधेनु कधीच समाधान देऊ शकणार नाही. त्यातून सदगुरु हे निरपेक्ष आहेत तेव्हा त्यांना कामधेनूचा काहीच उपयोग होणार नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.