महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भगवंतांना गुरुदक्षिणा काय द्यावी हे उद्धवाला कळेना

06:30 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतीसावा

Advertisement

भगवंतांनी आपला उद्धार केला हे पाहून त्यांच्याविषयी उद्धवाच्या मनात कृतज्ञता दाटून आली. त्यांचा मी कसा उतराई होईन ह्याबद्दल त्याच्या मनात विचार येऊ लागले. गुरुदक्षिणा म्हणून काय दिले म्हणजे त्यांच्या उपकाराची थोडीतरी परतफेड होईल ह्यावर तो चिंतन करू लागला. सद्गुरूंना भेट द्यायसाठी त्याने अनेक गोष्टींचा विचार केला पण अमुक एक गोष्ट गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरूंना द्यावी ह्यावर त्याच्या मनाचा निश्चय होईना कारण ज्या ज्या गोष्टीचा तो विचार करू लागला तो तो त्याच्या लक्षात येऊ लागले की, कोणतीही वस्तू समाधानकारक नसून आपले सद्गुरू तर पूर्ण समाधान मूर्ती आहेत. भेट वस्तूबाबत त्याच्या मनात असे विचार आले की, सद्गुरूंना चिंतामणी द्यावा तर त्यातूनच आणखी वस्तू मिळाव्यात अशी इच्छा निर्माण होऊन त्याबद्दल चिंतन सुरू होते. सद्गुरूंना कल्पवृक्ष द्यावा तर तो कल्पिलेली वस्तू देईल परंतु त्यातून अनेक कल्पना वाढून सगळाच घोटाळा होईल. सद्गुरूंनी तर आपल्याला निर्विकल्प हो असे सांगितले आहे आणि आपणच दिलेल्या वस्तूतून त्यांच्या कल्पना वाढवल्या सारखे होईल. सद्गुरूंना लोखंडाचे सोने करणारा पारसमणी म्हणजे परीस द्यावा तर सद्गुरूंच्या चरणांना ब्रह्मत्वाने स्पर्श केला असल्याने  पारसमणी देऊन त्यांचे उपकार कदापि फिटणार नाहीत. सद्गुरूंना कामधेनु द्यावी तर तिने एक इच्छा पुरी केली की, त्यातून नवीन इच्छा तयार होते. त्यातून सदगुरु हे निरपेक्ष आहेत तेव्हा त्यांना कामधेनूचा काहीच उपयोग होणार नाही. त्रिभुवनातली सगळी संपत्ती गोळा करून सद्गुरूंना दिली तरी संपत्ती ही मायिक वस्तू आहे. आता ज्याने अमायिक वस्तु दिली त्याला मायिक वस्तूचे काय महत्त्व असणार, तेव्हा मायिक वस्तू त्यांना दिली तर त्यांच्या उपकाराची परतफेड होणार नाही. सद्गुरूंना देहच अर्पण करावा तर हा देह कधी ना कधी नष्ट होणारा आहे आणि सद्गुरू तर अनश्वर म्हणजे कधीही नष्ट न होणारे आहेत. त्यामुळे माझा नश्वर देह त्यांना देऊन त्यांचे उपकार फिटण्यासारखे नाहीत. त्यांना देह अर्पण करायचा विचार केला तर ज्याने आव्हाशंख म्हणजे उजव्या मुखाचा फार मंगलदायक शंख आपल्याला दिला त्याला फुटकी कवडी दिल्यासारखे होईल किंवा मिथ्या असलेले जीवत्व त्यांना दिले तर सत्य वस्तूला मिथ्यत्व देऊन त्यांनाच लाजवल्यासारखे होईल. थोडक्यात काया, वाचा, मन, धन हे सगळं जीवप्राणासह सद्गुरूंना अर्पण केले तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होणार नाही हे उद्धवाने ओळखले. विचार करून करून तो अगदी थकून गेला. ज्याच्यामुळे औषधालासुद्धा दु:ख शिल्लक रहात नाही असे निजसुख ज्यांनी दिले त्यांचे उपकार मी आता कसे फेडू ह्या विचारांनी गोंधळून गेलेल्या उद्धवाने काहीही न बोलता भगवंतांना साष्टांग नमस्कार घातला आणि भगवंतांच्या चरणावर अतीव कृतज्ञतेने डोके टेकवले. भगवंतांनी त्याला उठवले व आत्यंतिक प्रेमाने जवळ बसवून घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि अतिशय गोड आवाजात विचारले, उद्धवा, मी निजधामाला जाणार म्हणून कळल्यावर माझ्या वियोगाच्या कल्पनेने तुला अत्यंत दु:ख झाले होते. माझ्या सहवासाचा तुला अत्यंत मोह जडला असल्याने माझा विरह सहन होणार नाही असे तुला वाटत होते परंतु मी आत्तापर्यंत केलेल्या विवेचनाने मी निजधामाला जाणार ह्या कल्पनेने तुला झालेले दु:ख आणि माझ्या सहवासाचा मोह ह्या दोन्ही गोष्टी कमी झाल्या की, नाही ते सांग. अजून काही शंका असल्यास तुला आणखीन समजाऊन सांगायला मी तयार आहे. भगवंतांचा प्रश्न ऐकून उद्धव चकित झाला भगवंतांच्याबद्दलचा त्याला वाटणारा आदर कैकपटीने वाढला. श्रीचरणांना वंदन करून दोन्ही हात जोडून तो उभा राहिला. त्याला गहिवरून आले. स्वत:ला सावरून भगवंतांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सज्ज झाला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article