For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News : Raj and Uddhav ठाकरे यांच्या एकत्र येण्याने कोणाची अस्वस्थता वाढणार?

11:14 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
political news   raj and uddhav ठाकरे यांच्या एकत्र येण्याने कोणाची अस्वस्थता वाढणार
Advertisement

ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची चर्चा पुढे सरकेल तशी शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता वाढणार?

Advertisement

By : प्रवीण काळे

मुंबई :  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणे हा उध्दव आणि राज ठाकरे यांच्यासमोरील अखेरचा पर्याय आहे. दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या निर्णयावर अद्याप तरी सकारात्मक असल्याचे दिसत आहे, मात्र या निर्णयामुळे सगळ्यात जास्त अस्वस्थता शिवसेना शिंदे गटात पहायला मिळत आहे.

Advertisement

शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना, ठाकरे बंधूंसोबत शिवसेना शिंदे गटाने देखील एकत्र यावे असे सांगत शिवसेना शिंदे गटाला देखील घरचा आहेर दिला आहे.भाजप आणि काँग्रेस प्रणित शिवसेनेपेक्षा बाळासाहेबांची शिवसेना हा पर्याय महत्त्वाचा असल्याचे विधान किर्तीकर यांनी केल्याने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

एकही आमदार नसलेली मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जवळपास मुंबईतील सगळे नगरसेवक, महत्त्वाचे नेते शिंदे गटात गेल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी निर्वाणीची असणार आहे. ठाकरे ब्रॅन्ड टिकवण्यासाठी एकत्र येण्याच्या चर्चेने मात्र राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू संपले असल्याचे विरोधक बोलत असले तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता वाढताना दिसत आहे. 19 जूनला शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन होत आहे. या वर्धापन दिनाच्या दिवशी उध्दव ठाकरे मनसेसोबत जाण्याबाबत सूतोवाच करण्याची शक्यता आहे.

उध्दव ठाकरे यांनी जनतेच्या मनात आहे तेच होईल असे सांगितले, तर राज ठाकरे यांना पत्रकारांनी कुठे चालले असे विचारले असता, मिश्किलपणे ‘मातोश्री’वर चाललो असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावरच मुंबई महापालिका निवडणुकीची सगळी राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांसमोर दुसरा पर्याय असूच शकत नाही.

भाजपची स्वत:ची मुंबईत ताकद आहे, मात्र शिवसेना शिंदे गटाला स्वतंत्र लढल्यास त्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यास ही निवडणूक जड जाणार यात शंका नाही. शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच मुंबई महापालिका ही आघाडीत लढणार नसल्याचे सांगितल्याने, ठाकरे यांचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना शहा यांनी राज ठाकरे यांना भेटीसाठी बोलवले होते, मात्र राज यांनी शहा यांची भेट टाळल्याची राजकीय चर्चा होती. ठाकरे बंधूंच्या सुरूवातीच्या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली होती, मात्र आता तेच मुख्यमंत्री या प्रश्नावर बोलण्याचे टाळत आहेत.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणूक ही खरी शिवसेना कोणाची हे सांगणारा अखेरचा पर्याय असणार आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या विषयावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांनाच घरचा आहेर दिला आहे.

केवळ 48 मतांनी लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरेंसोबत असलेल्या आपल्या मुलाचा झालेला पराभव, अखेरच्या क्षणी नाट्यामयरित्या झालेल्या या पराभवाचे शल्य किर्तीकरांना अजूनही आहे. तर किर्तीकर हे उध्दव ठाकरेंसोबत असते तर अमोल यांचा नक्कीच विजय झाला असता, असे देखील राजकीय जाणकार बोलत आहेत.

दुसरीकडे शिवसेनेचे दुसरे नेते माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देताना अडसूळ यांना राज्यपाल बनविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांची बोळवण महामंडळावर केली. राज आणि उध्दव ठाकरे या दोघांसोबत काम केलेले शिवसेना नेते, जे आज शिंदेंसोबत असले तरी त्यांचे प्राधान्य हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला असणार हे मात्र नक्की.

त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची चर्चा जसजशी पुढे सरकेल तशी शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता वाढणार आहेदुसरीकडे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी येत्या पावसाळ्यात आदित्य ठाकरे हे तुरूंगात असतील, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटावर भाजपकडून दबावतंत्राचा वापर तर केला जात नाही ना? अशीही चर्चा आहे.

भाजपची स्वत:ची अशी हक्काची व्होटबँक मुंबईत आहे. 2017 ला स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढविताना भाजपने 82 जागांवर विजय मिळविला होता, तर शिवसेनेने 96. केवळ 14 जागांचा फरक दोघांमध्ये होता. त्यावेळी भाजपने जर मनात आणले असते तर भाजपचा पहिला महापौर महापालिकेत बसवला असता.

शिवसेना शिंदे गटाला मात्र स्वबळावर निवडणूक लढताना ठाकरे बंधूंसमोर चांगलाच कस लागणार आहे. नेते आणि पदाधिकारी जरी उध्दव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेले असले तरी, कार्यकर्ते मात्र हललेले नसल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा जरी या युतीला विरोध असला तरी, दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र येण्यावर ठाम असले तर कोणाचे काही चालणार नाही, हे मात्र नक्की.

Advertisement
Tags :

.