For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

... तर 2019 साली दक्षिणचा निकाल वेगळा असता, अजित पवारांचा गौप्यस्फोट

01:08 PM Apr 20, 2025 IST | Snehal Patil
    तर 2019 साली दक्षिणचा निकाल वेगळा असता  अजित पवारांचा गौप्यस्फोट
Advertisement

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही, भव्य शक्तिप्रदर्शनाने उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Advertisement

कराड : दिवंगत लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा राजकारण व समाजकारणाचा वारसा उदयसिंह पाटील पुढे चालवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करणारा पक्ष आहे. विलासकाकांनी आयुष्यभर यशवंत विचार जपला. वाढवला. त्या विचारांचे वारसदार उदयदादा असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे कराडच्या भूमीत दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला आहे. भविष्यात महाराष्ट्राची ताकद उदयदादांच्या पाठिशी उभी करू. आगीतून उठून फुफाट्यात पडलो, अशी त्यांची अवस्था होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात उंडाळकर गटाने भव्य शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, विजयसिंह यादव, प्रदीप विधाते, आदीराज पाटील- उंडाळकर आदींची उपस्थिती होती.

Advertisement

अजित पवारांनी या कार्यक्रमात दिवंगत विलासकाका पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव केला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, उदयसिंह पाटील यांना थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर, दिवंगत विलासकाका यांचा मोठा वारसा लाभला आहे. राज्यात काम करत असताना जात, धर्म आणि पंथ ही भूमिका आम्हाला पटत नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. देश आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करत असताना आपण कोणतीही विचारधारा सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती, धर्म, पंथ, भाषिकांना बरोबर घेऊन वाटचाल करणार आहे. सर्वांना मान. सन्मान, सुरक्षितता मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.

1999 साली सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या विचारांची होती. विलासकाकांनी जिल्ह्यातील संस्था कधीही बाजूला जाऊ दिल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकांत तरूण कार्यकर्ते, माता भगिनींना संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढून राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी करावी. सत्ता ही सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असते. सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारमध्ये प्रतिनिधी असणे गरजेचे असते. उदयदादांच्या सर्व संस्था सहकाराशी निगडीत आहेत. या संस्थांचे प्रश्न सोडवण्यात येतील.

वाकुर्डे योजनेसह त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मागण्यांना निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देऊन ते पुढे म्हणाले, 2047 साली विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांच्या योजना पुढे चालवायच्या आहेत. महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा घेऊन राष्ट्रवादी पक्ष काम करणार आहे.मंत्री मकरंद पाटील म्हणाले की, उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जिल्ह्याच्या दृष्टिने अतिशय महत्वपूर्ण प्रसंग आहे. रयत संघटनेवर कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही. अजितदादांमुळे मला मंत्रिपद व आमच्याच घरात खासदारकी मिळाली. हे अजितदादाच करू शकतात. त्यामुळे उदयदादांचा राष्ट्रवादीतील प्रवेश ही त्यांच्या राजकीय चांगल्या भविष्याची नांदी आहे.

अॅङ उदयसिंह पाटील म्हणाले की, गेली 60 ते 65 वर्षे पुरोगामी विचारांची पाठराखण आम्ही केली. त्यामुळे निर्णय घेणे सोपे नव्हते. काकांनी सरंजामी प्रवृत्तींना सत्तेबाहेर ठेवले. त्यांनी 60 वर्षात उभ्या केलेल्या कामाला संरक्षण आणि रयत संघटनेचे पालकत्व या आमच्या मागण्या आहेत. रयत बायो शुगरच्या उभारणीसाठी सरकारच्या माध्यमातून मार्गदर्शन, वाकुर्डे योजनेसह दक्षिणमधील सिंचनाचा प्रश्न, कोडोली पुलाचा प्रश्न, कराड शहरात भूमिगत वीज वाहिन्या आदी महत्वाच्या प्रश्नांबाबत निधी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रा. धनाजी काटकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उदयदादांसह वडूजचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह रयत संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते करण्यात आला.

तर 2019 साली दक्षिणचा निकाल वेगळा लागला असता

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कराड दक्षिणमधून पृथ्वीराजबाबांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विलासकाका अपक्ष उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीतून लढण्याबाबत काकांना सांगितले होते. मात्र काकांनी त्यास नकार देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विलासकाकांनी त्यावेळी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली असती तर कराड दक्षिणचा निकाल त्यावेळी वेगळा लागला असता, असा गौप्यस्फोट अजितदादांनी आपल्या भाषणात केला.

Advertisement
Tags :

.