सर्वव्यापी वारी...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकोबारायांच्या पालख्या आता पंढरीच्या वाटेवर आहेत. याशिवाय संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत निळोबाराय यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचेही पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळे आषाढी वारीचा हा सुखसोहळा अधिकच ऊर्जादायी व चैतन्यदायी बनला आहे. तुकोबांच्या पालखीचे देहूहून, तर माउलींच्या पालखीचे अलंकापुरीतून प्रस्थान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सोहळ्यास प्रारंभ होतो. पुणेकर व सासवडकरांच्या प्रेमळ पाहुणचारानंतर माउलींची पालखी जेजुरीत, तर तुकोबांची पालखी वरवंड मुक्कामी विसावली आहे. पुढील 12 दिवस भक्तीचा हा प्रवाह असाच पुढे सरकत राहणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला भक्तीचा हा अनुपम्य सोहळा अनुभवायला मिळेल. वास्तविक वारीचा उगम नेमका कधीचा, ती कशी सुरू झाली, हे छातीठोकपणे सांगता येत नाही. किंबहुना, शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. सतराव्या शतकाच्या शेवटी संत तुकाराम महाराज यांचे तृतीय पुत्र नारायणबाबा यांनी वारीला ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीची आणि भजनाची जोड देत सोहळ्याचे रूप दिले. तर श्री गुरू हैबतबाबांनी वारीला अधिक शिस्तबद्ध स्वऊप दिल्याचे सांगितले. वैष्णवांचा हा मेळा आता महामेळ्यामध्ये ऊपांतरित झाला असून, वर्षागणिक वारीची व्याप्ती, परीघ वाढतानाच दिसत आहे. ‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।’ असा आत्मविश्वास बाळगत लाखो वारकरी दरवर्षी आषाढीच्या वारीत सहभागी होत असतात. वारीचा हा नेम चुकत नाही. म्हणूनच नियमितपणे वारी करतो, तो वारकरी. अर्थात हे वारी व वारकरी हे शब्द भिन्न असले, तरी वारी आणि वारकरी वेगळे नाहीत. ना कोणता सांगावा, ना आमंत्रण. केवळ विठुरायाच्या आत्मिक लळ्यातूनच वारकरी वारीमध्ये एकवटतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापैकी कशाचीही तमा न बाळगता वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या दिशेने पडतात. पंढरीची वाट कितीही बिकट का असेना. विठुनामातून ती सहजसोपीच होऊन जाते. मुख्य म्हणजे वारीत उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेदभाव नाही. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।।’, हे संत तुकाराम महाराजांचे वचन हे वारीचे सार होय. तर नामा म्हणे येथे नको दुजा भाव, हे वारीचे मर्म. खरे तर सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाचा मूलाधार आहे. म्हणूनच वारी हा केवळ आनंदाचा, चैतन्याचा नव्हे; तर आचारविचारांचा, समत्वाचा आणि सर्वव्यापकत्वाचाही मूर्तिमंत आविष्कार आहे, असे म्हणावे लागेल. काळ बदलला, बदलत जाईल. तरीही वारीबद्दलची जनमानसातील ओढ वाढतच आहे. पंढरपुरात विसावेपर्यंत हा संतभार दहा ते पंधरा लाखांवर पोहोचतो. एका लयीत इतक्या शिस्तबद्धपणे हा सोहळा कसा पार पडतो, हा म्हणूनच कुतुहलाचा व अभ्यासाचा विषय ठरतो. भल्या पहाटे अगदी ठरलेल्या वेळेतच पालखी सोहळा मार्गस्थ होतो. दिंड्या निश्चित स्थानाप्रमाणे सोहळ्यात सामील होतात. विसाव्याच्या ठिकाणी पोहोचणे, भोजनाचे नियोजन, रिंगण सोहळा यासह एकूणच व्यवस्थापन व नियोजन याला जगात तोड नसावी. अलीकडच्या काळात सोहळ्यात काही हवश्या, नवश्या, गवश्यांचाही सहभाग वाढला आहे. वेगवेगळ्या संस्थानमध्येही काही उद्धट मंडळींचा शिरकाव झाला आहे. अशा मंडळींपासून सावध रहायला हवे. वास्तविक, वारीचे मर्म प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. संतांचे आचारविचार समजून घेतले, तरच खऱ्या अर्थाने वारी म्हणजे काय, हे समजू शकेल. वारीच्या निमित्ताने दर वर्षी स्वच्छतेवरही चर्चा होते. त्यादृष्टीने प्रयत्नही होत असतात. तथापि, स्वच्छतेच्या बाबतीत आणखी बरेच काही करण्यास वाव आहे. म्हणूनच भविष्यात निर्मल वारीसाठी प्रयत्न करायला हवेत. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गाव, आपला परिसर याच्या स्वच्छतेबाबत प्रबोधन केले आहे. इतकेच नव्हे; तर स्वत: झाडू हातात घेऊन सर्वांसमोर आदर्श ठेवला. त्यामुळे वारकरी, गावकरी यांसह सगळ्यांनीच यातून बोध घेत भक्तीबरोबरच स्वच्छतेचाही जागर करायला हवा. अधिकाधिक शौचालये उपलब्ध करण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढे यावे. वारी आणि पावसाच्या सरी, हेही समीकरणच. मात्र, यंदा अगदी प्रस्थानापासूनच पावसाचा अधिकचा जोर पहायला मिळत आहे. देशात यंदा 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही सध्या चांगला पाऊस होत असून, जूनमध्ये सर्वदूर दमदार पाऊस झाल्याचे दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गतवर्षी राज्यात केवळ 20 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा हा साठा 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही विठ्ठलाचीच कृपा म्हणायची. पुढचे तीन महिनेही पीकपाण्याच्या दृष्टीने चांगले जावेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस यावेत, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना असेल. मागच्या काही वर्षांत आळंदीतील इंद्रायणी व पंढरपुरातील चंद्रभागेसह तीर्थक्षेत्रांच्या परिसरातील नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंद्रायणी, चंद्रभागेसारख्या नद्यांना प्रदुषणाने विळखा घातला आहे. निर्माल्य, राडारोडा, सांडपाण्यामुळे या नद्या गटारगंगा होत आहेत. हे काही आपल्यासाठी भूषणावह म्हणता येत नाही. म्हणूनच नद्यांचे पुनऊज्जीवन व्हावे, याकरिता वारकरी, भाविक, समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नमामि चंद्रभागा किंवा नमामि इंद्रायणीसारखे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. परंतु, या प्रकल्पांचा गाजावाजाच जास्त झाला. प्रत्यक्षात काय झाले, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन ठोस कृती करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, मागच्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी, जातीयता, हुंडाबळी यांसारख्या प्रश्नांनी डोके वर काढले आहे. आदर्श मानली जाणारी आपली समाजव्यवस्था ढासळत असून, संस्काराची परंपरा इतिहासजमा होत आहे. अशा वेळी संतविचारच आपल्याला तारू शकतात. म्हणूनच संतविचार आणि वारीतील आचारणभावाची कास धरूनच आपल्याला पुढे जावे लागेल.