युएईत मंदिर, जगाला सद्भावनेचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन : युएईच्या अध्यक्षांचे मंदिरासाठी मानले आभार
वृत्तसंस्था/ अबुधाबी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या संयुक्त अरब अमिरात दौऱ्यादरम्यान अबुधाबी येथे 27 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे बुधवारी उद्घाटन केले आहे. या मंदिरात पंतप्रधान मोदींनी पूजा केली आहे. हे भव्य मंदिर बोचासनवासी श्री अक्षय पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच बीएपीएसने उभारले आहे. या मंदिराच्या उभारणीकरता 700 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. युएईतील हिंदू मंदिराच्या उद्घाटनानंतर तेथे वैश्विक आरती करण्यात आली आहे. संबंधित वेळेत युएईसोबत भारत तसेच अन्य अनेक देशांमधील बीएपीएस मंदिरांमध्ये एकाचवेळी आरती करण्यात आल्याने याला वैश्विक आरती संबोधिण्यात आले आहे.
युएईतील हे मंदिर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. मंदिर उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी आरतीमध्ये भाग घेतला आहे. आरती पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदींनी गर्भगृहात जात प्रत्येक देवतेच्या मूर्तीवर पुष्प अर्पण केले. यानंतर महंत स्वामी यांचा आशीर्वाद घेतला आहे. मंदिरात निर्माण करण्यात आलेल्या गंगा घाटावर मोदींनी पूजनही केले. अबुधाबीतील या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याकरता हजारो भारतीय उपस्थित होते. या भारतीयांनी यावेळी मोदींच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.
मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वॉल ऑफ हारमनीचे निरीक्षण पेले. वॉल ऑफ हारमनी ही युएईतील सर्वात मोठी 3-डी प्रिंटेड भिंत आहे. ही भिंत 45 मीटर लांब आणि 4.5 मीटर उंच आहे. या भिंतीवर जगातील 26 स्मारकांना दर्शविण्यात आले आहे. यात फ्रान्समधील आयफेल टॉवर, भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सामील आहे. या वॉल ऑफ हारमनीद्वारे पूर्ण जग एक असल्याचा संदेश देण्यात आला आहे. युएईतील मंदिर उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि विवेक ओबेरॉय यांनी हजेरी लावली.
अबुधाबीतील हे मंदिर 27 एकर क्षेत्रात निर्माण करण्यात आले असून याची उंची 108 फूट इतकी आहे. हे मंदिर वास्तुशिल्प आणि स्वत:च्या भव्यतेद्वारे पूर्ण जगाला आकर्षित करत आहे. राजस्थानातील गुलाबी बलुआ शिलांद्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे. हे मंदिर पश्चिम आशियात आकाराने सर्वात मोठे आहे. या मंदिरात 7 कळस असून ते सात अमिरातींचे प्रतिनिधित्व करतात. मंदिरात आखाती देशांची संस्कृती विचारात घेत ऊंटांची चित्रे कोरण्यात आली आहेत. तसेच युएईचा राष्ट्रीय पक्षी देखील नक्षीकामाद्वारे मंदिराच्या भिंतींवर रेखाटण्यात आला आहे.
मुस्लीम शासकाकडून भूमी, ख्रिश्चन आर्किटेक्टकडून डिझाइन
युएईतील हे मंदिर दुबई-अबुधाबी शेख जायद हायवेनजीक अल रहबामध्ये अबु मुरेखा नावाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. हे मंदिर बीएपीएसकडून निर्माण करण्यात आले आहे. या संस्थेची जगभरात 1200 हून अधिक मंदिरे आहेत. दिल्ली आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिर याच संस्थेने निर्माण केले आहे. अबुधाबीतील मंदिरासाठी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी भूमी प्रदान केली होती. या मंदिराचे वैशिष्ट्या म्हणजे याच्या निर्मितीकार्यात सर्व धर्मांशी निगडित लोकांचे योगदान राहिले आहे. या मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट ख्रिश्चनधर्मीय तर प्रकल्प व्यवस्थापक शिखधर्मीय होता. तर डिझायनर म्हणून बौद्धधर्मीय व्यक्तीने जबाबदारी पार पाडली आहे. निर्मिती कंपनी एका पारशी धर्मीय व्यक्तीची आहे, या कंपनीचा संचालक जैनधर्मीय आहे.
नागर शैलीतील मंदिर
27 एकरमध्ये फैलावलेले हे मंदिर नागर शैलीत उभारण्यात आले आहे. मंदिर 13.5 एकरमध्ये उभारलेले असून 13.5 एकरमध्ये पार्किंगची सुविधा असणार आहे. या मंदिराकरता 50 हजार घनफूट इटालियन मार्बल, 18 लाख घनफूट इंडियन स्टँड स्टोन आणि 18 लाख दगडी विटांचा वापर करण्यात आला आहे. मंदिर उभारणीसाठी लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही, यामुळे हे मंदिर हजारो वर्षांपर्यंत स्वत:चे अस्तित्व राखू शकणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 8 मूर्ती असून त्या सनातन धर्माच्या 8 मूल्यांचे प्रतीक आहेत. मंदिराचे एम्फीथिएटर बनारस घाटाच्या आकाराचे असून तेथे लोकांना भारतीयत्वाचा आभास होणार आहे.