युएईने दिली तालिबानच्या राजदूताला मंजुरी
वृत्तसंस्था/काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला मोठे कूटनीतिक यश मिळाले आहे. आखातातील प्रभावशाली मुस्लीम देश संयुक्त अरब अमिरातने नव्या तालिबानी राजदूताचे परिचय पत्र स्वीकारले आहे. चीननंतर युएईने तालिबानकडून नियुक्त करण्यात आलेल्या राजदूताचे परिचयपत्र स्वीकारले आहे. जगातील अद्याप कुठल्याही देशाने तालिबानी राजवटीला मान्यता दिलेली नसताना युएईने हे पाऊल उचलले आहे. तालिबानने आता पाकिस्तानला बाजूला करत स्वत:च सर्व देशांसोबत संपर्क साधण्याचे धोरण अवलंबिले आहे. तर युएईचा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. तालिबानने बदरुद्दीन हक्कानीला युएईतील नवा राजदूत म्हणून नेमले आहे. तालिबानी राजवट सातत्याने जगभरातील देशांशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवू पाहत आहे. मागील आठवड्यात उझ्बेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अरिपोव यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. तालिबानची राजवट आल्यावर कुठल्याही मोठ्या विदेशी नेत्याचा हा पहिलाच दौरा होता.