यू मुंबा, अहमदाबाद संघ दुसऱ्या विजयासाठी सज्ज
वृत्तसंस्था/चेन्नई
2024 च्या अल्टिमेट सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत यू मुंबा आणि अहमदाबाद पिपेर्स हे दोन्ही संघ दुसरा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारी यू मुंबा आणि अहमदाबाद यांच्यातील सामना येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये खेळविला जाईल.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या दोन सामन्यात यू मुंबा आणि अहमदाबाद या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली होती. पहिल्या सामन्यात यू मुंबाने दबंग दिल्लीचा 9-6 असा पराभव केला. तर अहमदाबाद पिपेर्सने विद्यमान विजेत्या अॅथलेड गोवा चॅलेजंर्स संघाचा पराभव केला. तत्पूर्वी अहमदाबाद संघाला पहिल्या सामन्यात पुणेरी पल्टन संघाकडून 5-10 अशी हार पत्करावी लागली होती.
यू मुंबा संघामध्ये मानव ठक्कर, सुतीर्थ मुखर्जी, नायजेरियाची अरुणा कद्री, आकाश पाल, काव्यश्री भास्कर आणि स्पेनची मारिया झियाओ यांचा समावेश आहे. अहमदाबाद पिपेर्स संघात मुनश शहा, रुमानियाचा सोझेस, फ्रान्सची लिलीयान बार्डेट, रिथ टेनिसन, प्रिता वर्तीकर आणि जेस मोदी यांचा समावेश आहे.