कालमेगी चक्रीवादळामुळे फिलिपाईन्समध्ये हाहाकार
241 जणांचा मृत्यू : पूर्ण देशात आणीबाणी घोषित
वृत्तसंस्था/मनिला
फिलिपाईन्समध्ये कालमेगी चक्रीवादळ धडकले असून यामुळे तेथील अनेक भागांमध्ये हाहाकार दिसून आला आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीवितहानी झाली आहे. 130 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक घरे नष्ट झाली आहेत. चक्रीवादळामुळे आतापर्यंत 241 जणांना जीव गमवावा लागला आहे. फिलिपाईन्सच्या मध्य क्षेत्रांमध्ये हानी घडवून आणणाऱ्या या चक्रीवादळाने व्हिएतनामच्या दिशेने सरकताना पुन्हा शक्ती प्राप्त केली आहे. व्हिएतनामच्या जिया लाई प्रांतात अतिवृष्टी आणि विनाशकारी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला. फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांनी आणीबाणी घोषित केली. पूरस्थिती पाहता सुमारे 3,50,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर ओसरल्यावर विध्वंसाची स्थिती स्पष्ट झाली, तेथे कोसळलेली घरे, उलटलेली वाहने आणि चिखलयुक्त रस्ते दिसून आले आहेत.
चिखल हटविणे मोठे आव्हान
चक्रीवादळानंतर आता खरे आव्हान चिखल हटविणे आहे. गाळ हटविल्यावरच बेपत्ता लोकांचा शोध घेता येईल, तसेच मदतकार्याला वेग देता येणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी रॅफी एलेजांद्रो यांनी सांगितले. कालमेगी चक्रीवादळाला स्थानिक स्वरुपात टीनो म्हटले जातेय. तर फिलिपाईन्समध्ये पुढील आठवड्यात नवे चक्रीवादळ धडकू शकते. चालू वर्षात आतापर्यंत फिलिपाईन्सला एकूण 20 चक्रीवादळांना सामोरे जावे लागले आहे.