कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अविवाहित तरुणांना ‘सावधान’ करणारे फसवणुकीचे प्रकार उघड

06:02 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फंडे वापरून लोकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार आज देशभर उघडकीस येत आहेत. तंत्रज्ञानाद्वारे काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा ध्यास घेतलेली माणसं समाजात आहेत. परंतु तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून इतरांची फसवणूक करणाऱ्यांची संख्यासुद्धा काही कमी नाही. काळानुरुप बदलत्या सामाजिक स्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी ही मंडळी तत्पर असतात. एखाद्याच्या आर्थिक फसवणुकीसाठी अनेक योजना त्यांच्या डोक्यात सतत घोळत असतात. यातीलच काहींनी आता लग्न होत नसलेल्या अविवाहित तरुणांना आपले ‘लक्ष्य’ करायला सुरुवात केली आहे. कोकणातही अविवाहित तरुणांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येऊ लागलेत. यात लाखो रुपये, दागदागिने आणि महागडे मोबाईल्स तरुणांनी गमावले आहेत.

Advertisement

लग्न जुळविताना मुलाला चांगली नोकरी आहे का, त्याचा उद्योग-व्यवसाय नीट चालतो का, घरचे राहणीमान कसे आहे, कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आहे का, या सर्व बाबी तपासल्या जातात. आपल्या मुलीच्या वाट्याला कष्टदायक जीवन येऊ नये, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळे आजच्या घडीला शेतकरी, मच्छीमार, बागायतदार अशा कष्टकरी वर्गातील तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. परिणामत: अविवाहित तरुणांची संख्या वाढत चालली आहे.

Advertisement

‘लग्न व कुटुंब व्यवस्था’ या विषयातील अभ्यासक सांगतात, 25 वर्षांपूर्वी गर्भलिंग चाचण्यांचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम मुलींच्या संख्येवर झाला आणि आज 25 वर्षांनंतर ‘त्या’ पिढीतील काही मुलांना लग्नासाठी योग्य वयात मुलगी मिळणे कठीण होऊन बसले आहे. मुलगा आणि मुलगी जन्मदराचे प्रमाण सम नसल्याने अविवाहित तरुणांची संख्या वाढत चालली आहे. परंतु वाढत्या वयाचा ताण, स्वत:ची शारीरिक व मानसिक गरज, समाज आणि घरातील व्यक्तींचा आग्रह या गोष्टी या तरुणांना स्वस्थ बसू देत नाहीत. नातेवाईक, मित्र यांची लग्ने झाली. पण, आपला पुढचा वंश नाही ही पोखरत जाणारी भावना त्यांना कुठेतरी नैराश्येच्या खाईत ढकलतेय.

अविवाहित तरुणांच्या नेमक्या याच निराशावादी मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी काहींनी आपले नवे उद्योग सुरू केले आहेत. गरजवंतांना लग्नाच्या मोहात पाडून आपले पोट भरणारे एजंट फोफावले आहेत. या लोकांनी आता कोकणातही आपला मोर्चा वळविला असून कोकणातही अशा प्रकारचे ‘महाठक’ तयार होऊ लागलेत. विशेष म्हणजे यात विवाहित महिलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. अविवाहित तरुणांना हेरून त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे, दागिने, महागडे मोबाईल उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याला अनेकजण बळी पडत आहेत. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात गेल्या महिनाभरात अविवाहित तरुणांच्या फसवणुकीची तीन प्रकरणे समोर आली. यातील दोन प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर तिसऱ्या प्रकरणात सहभागी चार संशयित महिलांचा शोध घेण्यासाठी संभाजीनगर येथे गेलेल्या पोलीस पथकाला हे चारजणांचे टोळके सापडू शकलेले नाही.

मालवणात उघडकीस आलेल्या पहिल्या प्रकरणात एका तरुणाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडील 82 हजार 400 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने घेऊन दाम्पत्य पसार झाले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीला दागिने दाखवायचे असल्याच्या बहाण्याने दाम्पत्य नवरदेवाकडून दागिने घेऊन गेले. मात्र, लग्नाच्या दिवशी मुहूर्त टळला, तरी आलेच नाहीत. या प्रकरणात ज्याला अटक झालेली आहे, त्याच्यावर रायगड, पोलादपूर, दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दुसऱ्या प्रकरणात लग्नाला अवघे बारा दिवसच झाले असताना नववधूने घरातील रोख रकमेसह सर्व दागिने घेऊन पळ काढला. हळद उतरण्याआधीच नववधूने दागिने लंपास केले. या प्रकरणातील अविवाहित तरुणाकडे संभाजीनगर येथील एका मध्यस्थ महिलेने लग्न जुळविण्यासाठी दोन लाख रुपये मागितले होते. नवरदेवाला मुलगी दाखविण्यात आली. मुलीने आपली आई सावत्र असून ती आपल्याला मारझोड करते. त्यामुळे आपण लग्न करून तुमच्यासोबत राहायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर लग्न संभाजीनगर येथेच करण्याचे निश्चित झाले. लग्नाच्या दिवशी मध्यस्थी केलेल्या महिलेने पहिल्यांदा 50 हजार रुपये घेतले. नंतर दीड लाख रुपये घेतले. संभाजीनगर येथे एका वकीलाने वधु-वरांची सही घेतली. मध्यस्थ म्हणून अन्य तीन महिलांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर तेथील मंदिरात पाया पडत एकमेकांना हार घालत विवाह सोहळा पार पडला. मालवणमध्ये आल्यानंतर सत्यनारायण महापूजाही झाली. लग्नानंतर बारा दिवसांनी दोघेही बसने बाहेर जायला निघाले. बसस्थानकाजवळ आले असता, नववधुने आपला मोबाईल घरी राहिला असल्याचे सांगितले. तसेच तोपर्यंत तुमचा मोबाईल मला द्या, असे सांगून नवऱ्याचा मोबाईल आपल्याकडे घेतला. नवरा मोबाईल घेऊन बसस्थानकाजवळ आला असता, वधु बसस्थानकातून गायब होती. त्यानंतर नवऱ्याने शोधाशोध केल्यानंतर घरातील दागिनेही गायब असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात तरुणाची एकूण 3 लाख 49 हजार 740 रुपयांची फसवणूक झाली. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर चौकशी झाली, तेव्हा संबंधित वधू विवाहित असून तिला दोन मुलेसुद्धा असल्याची बाब पुढे आली. तिच्याविरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. मात्र, संभाजीनगरमधील या चारही संशयित महिला पोलिसांना सापडू शकल्या नाहीत. पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचे आव्हान कायम आहे.

फसवणुकीच्या या गुन्ह्यात खोट्या आधारकार्डचा वापर झाला आहे. तर तिसऱ्या प्रकरणात लग्न होणार म्हणून तयारी करून राहिलेल्या तरुणावर धोका देणाऱ्या महिलेस पोलिसांच्या मदतीने पकडण्याची वेळ आली. ही महिला विवाहित असल्याचे निष्पन्न झाले. आपल्याऐवजी दुसऱ्या मुलीचा फोटो तरुणास पाठवून ती अविवाहित तरुणास फसवित होती. गुन्हा दाखल होईपर्यंत तिने गुगल पेद्वारे संबंधित तरुणाकडून 1 लाख 60 हजार रुपये उकळले होते. परंतु सतर्क झालेल्या तरुणाने अखेर पोलिसांत धाव घेऊन या विवाहितेस गजाआड केले. या प्रकरणात अविवाहित तरुण आणि विवाहितेची एकदाही भेट झाली नव्हती. आपण रत्नागिरी येथे नोकरीस असून मूळ देवगड येथील असल्याचे तिने सांगत तरुणाकडून वेगवेगळी कारणे देत अनेकदा मोठ्या रकमा गुगल पेद्वारे मिळविल्या. लग्नाचा पहिला मुहूर्त टाळण्यासाठी नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे कारण पुढे केले. तर दुसऱ्या वेळी अन्य कारण पुढे करत, तोही मुहूर्त टाळला. अखेर आपली या तरुणीकडून फसवणूक होत असल्याची खात्री होताच, त्याने पोलिसांची मदत घेतली व तिला धडा शिकविला.

फसवणुकीची ही प्रकरणे पाहता, संबंधित तरुणांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी दर्शविली म्हणून ही प्रकरणे समोर आली. परंतु अजूनही अशी काही प्रकरणे आहेत, जी समोर आलेली नाहीत. त्या संदर्भात केवळ चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. ही प्रकरणे जर तक्रारीच्या स्वरुपात पोलीस स्टेशनला गेली, तर पोलिसांचे काम हे निश्चितच वाढणार आहे. तूर्तास मालवणातील दोन प्रकरणात पोलिसांनी चांगली तत्परता दाखवित संशयितांना अटक केली आहे. तर तिसऱ्या प्रकरणातील संशयित महिलांचे टोळके अद्याप मोकाट आहे. ही लोकं लग्न जुळविण्यासाठी पुन्हा कुणाला आपले गिऱ्हाईक बनवतील हे सांगता येत नाही. तरी अविवाहित तरुणांनी शुभ मंगल होण्याआधीच ‘सावधान’ राहिलेले बरे. पोलिसांनीसुद्धा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article