नदीकाठ रस्त्यावर गवतमिश्रित गाळ टाकण्याचा प्रकार
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कडून रस्त्यावर गाळ टाकण्याचा अजब कारभार : रस्त्यावर चिखलामुळे दलदल : रस्त्याची दुर्दशा : शेतकरी वर्गातून नाराजी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावच्या पश्चिम बाजूकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीकाठ शिवार परिसराकडे जाणाऱ्या व नुकतेच लाखो रुपये खर्च करून शासकीय निधीतून खडीकरण करून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. परंतू गावचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या कच्च्या कालव्यातील गवतमिश्रित गाळ या रस्त्यावर टाकण्याचा प्रकार चक्क ग्रा. पं. कडून झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून परिणामी रस्त्याचे अस्तित्व नाहीसे होऊन रस्ता खराब होणार आहे. संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावर टाकलेली गवतमिश्रित माती व गाळ त्वरित काढून रस्त्याचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची मागणी शेतकरी व महिला शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. गावाजवळील मराठी प्राथमिक शाळेच्या बाजूने मार्कंडेय नदीकाठ शिवाराकडे जाणारा हा गाडीमार्ग पाणंद कच्चा रस्ता होता. पावसाळ्यामध्ये सदर रस्त्यावर गुडघाभर चिखल होत होता. यामुळे शेतकऱ्यांना या चिखलातून रस्ता शोधत शेताकडे जावे लागत होते. त्यातच मागील चार वर्षापूर्वी संपूर्ण गावचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी या पाणंद रस्त्याच्या बाजूने दक्षिण बाजूने शेतकऱ्यांच्या शेतीतून सदर कच्चा कालवा तयार करण्यात आला. यामुळे गावचे संपूर्ण सांडपाणी व पावसाचे पाणी या कालव्यातून मार्कंडेय नदीला मिळते.
चार महिन्यापूर्वी केले खडीकरण
गेल्या चार महिन्यापूर्वीच शासकीय फंडातून मंजूर झालेल्या मोठ्या निधीतून पक्के खडीकरण करून लाल माती टाकून अगदी गुळगुळीत रस्ता तयार केला होता. परंतु रस्त्याच्या बाजूने सांडपाणी वाहून नेणाऱ्या कालव्यातील गवतमिश्रित गाळमाती ग्रा. पं.ने जेसीबीच्या सहाय्याने काढून रस्त्यावरच टाकून रस्त्याची रूंदी कमी केली आहे. तसेच रस्त्यावर टाकलेल्या गवतमिश्रित गाळमातीमुळे रस्त्याचे अस्तित्व नाहीसे होत असल्याच्याही प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.
हिंडाल्को कंपनीकडून जेसीबीचे सहाय्य
गावच्या पूर्वदिशेला असलेल्या हिंडाल्को कंपनीकडून प्रत्येकवर्षी गावातील सांडपाणी वाहून नेणारा ओढा तसेच मार्कंडेय नदीकाठ शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने शेतकऱ्यांच्या जागेतून तयार केलेल्या कालव्यातील गाळ काढणे आदी कामे ग्रा.पं. ला कळवून हिंडाल्को कंपनी जेसीबी लावून गाळ काढत असते. परंतु हिंडाल्को कंपनी फक्त जेसीबी गाळ काढण्याचे काम करत असल्यामुळे माती रस्त्याच्या बाजूला टाकत आहेत. परंतु हिंडाल्कोने गाळ ट्रॅक्टरमध्ये भरून दुसरीकडे टाकल्यास रस्त्याचे अस्तित्व टिकून राहणार आहे. तेव्हा पुढील वर्षापासून हिंडाल्कोने जेसीबी तसेच ट्रॅक्टरची व्यवस्था करून गाळ काढून कालवे व ओढे स्वच्छ करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी होत आहे.
गाळमाती जेसीबीने काढताना रस्ता खराब
सांडपाणी वाहून नेणाऱ्या कालव्यातील गाळ व गवतमिश्रित माती जेसीबीने बाजूला ट्रॅक्टर लावून जर ट्रॅक्टरमध्ये टाकली असती तर रस्त्याचे अस्तित्व टिकून राहिले असते. परंतु तसे न झाल्याने रस्त्यावर टाकलेली गाळ व गवतमिश्रित माती परत आता जेसीबीने ट्रॅक्टरमध्ये भरताना रस्त्यावरील खडी उखडून रस्त्याचे अस्तित्व नाहीसे होणार आहे. यासाठी ग्रा. पं. ने नियोजन आखून कोणतेही काम केल्यास शासकीय निधीचा चांगला सदुपयोग होईल, अशाही उपदेशाच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.