Solapur : वांगी गावात 24 तासांत दोन युवकांची आत्महत्या; परिसरात हळहळ
वांगीत दोन युवकांच्या आत्महत्यांनी खळबळ
अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग दोन घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी उघडकीस आली. गोरख तानाजी भोई (वय २१) या तरुणाने काही कारणातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब समजल्यावर नातेवाईकांनी त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
गोरखच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असतानाच दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २२) आणखी एक धक्कादायक घटना घडली. सुरेश दत्तात्रय भोई (वय २२) या युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेशची आई आणि बहिण शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गोरखच्या निधनानंतर मानसिक तणाव वाढल्याने सुरेशने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. सलग दोन युवकांनी आत्महत्या केल्याने वांगी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.