मुर्डेश्वर येथे लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
कारवार : इमारतीच्या बांधकामासाठी तात्पुरता उभारण्यात आलेली लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी कारवार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुर्डेश्वर येथे घडली. प्रभाकर मुताप्पा शेट्टी (वय 48, रा. बस्ती-मुर्डेश्वर) आणि बाबण्णा पुजारी (वय 45, रा. गोळीहोळी, ता. कुंदापूर, जि. उडुपी) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी इमारतीचे मालक आणि लिफ्ट कंपनीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी, कामत यात्री निवासाचे मालक असलेल्या वेकंटरमन कामत यांच्या मालकीच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले आहे.
इमारतीच्या वरच्या मजल्यावर बांधकाम साहित्यासाठी तयार करण्यात आलेल्या लिफ्टच्या सेफ्टी लॉक नादुरुस्त होऊन केबल कट झाल्याने लिफ्ट खाली कोसळला. कोसळलेल्या लिफ्टच्या खाली दोन कामगार सापडले आणि ते गंभीररित्या जखमी झाले. जखमी कामगारांना उपचारासाठी तातडीने भटकळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मणीपाल येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचार सुरू असताना दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. मयत प्रभाकर शेट्टी यांचे पुत्र श्रवण शेट्टी यांनी इमारतीचे मालक आणि लिफ्ट कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुरक्षिततेच्या अभावामुळेच सदोष यंत्रोपकरणामुळेच ही दुर्घटना घडली असे तक्रारीत म्हटले आहे. मुर्डेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत