Sangli News :कवठेमहांकाळमध्ये दुचाकी-टेम्पो अपघात, दोघेजण गंभीर जखमी
कवठेमहांकाळमध्ये दुचाकी अपघात,
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी दुचाकीची पिकअप टेम्पोला पाठीमागून झालेल्या धडकेत दोघे युवक गंभीर जखमी झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल श्रीमंत तुपे व सुमित संतोष येवले (दोघेही रा. आळसुंदे, ता. करमाळा) हे (एम. एच. १४ एफ.डब्ल्यू. ८९५५) या दुचाकीवरून मिरजच्या दिशेने जात होते. दरम्यान, कुची उड्डाणपुलावर समोरून जात असलेल्या पिकअप टेम्पो (एम.एच.१०- डी.टी.७७८६) ला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे व कवठेमहांकाळ पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना एस.आर. हॉटेलचे मालक रणजित शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या मोफत रुग्णवाहिकेतून प्रथम उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे तर नंतर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय मिरज येथे हलविण्यात आले.