Sangli Accident : मोटरसायकल अपघातात तासगावाचा युवक जागीच ठार
आदित्य याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासगाव : शहरातील तासगाव सांगली रोडवर झालेल्या मोटरसायकल अपघातात तालुक्यातील पुणदी येथील आदित्य सिदोबा चव्हाण (वय १८) याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटरसायकलवरील इतर चौघेजण या अपघातात जखमी झाले. याप्रकरणी भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी आदित्य याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटरसायकलची ट्रायल घेण्यासाठी गेला असता काळाने हा घाला घातला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी जखमी प्रवीण प्रभाकर पाटील रा. वरचे गल्ली, तासगाव यांनी मयत आदित्य चव्हाण यांच्याविरुद्ध फिर्याद आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव वरचे गल्ली येथील प्रवीण पाटील हे आपल्या कुटुंबासह एम एच १०, बी एन ७५७० या आपल्या मोटरसायकल वरून सोमवारी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान दत्तमाळ येथील नगरपरिषदेच्या उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी घेऊन जात होते.
यावेळी आदित्य हा आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगाने येऊन त्याने पाटील यांच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की गाडीवरील सर्वजण उडून रस्त्यावर पडले व आदित्यही गाडी सोबतच सुमारे दीडशे ते दोनशे फुटावर फरपडत रस्त्यावर या अपघातात फिर्यादी प्रवीण, मुलगी मनस्वी, मुलगा उत्कर्ष, पत्नी अलका हे चौघेजण गंभीर जखमी झाले.
आदित्य याच्यावर तासगाव येथे प्राथमिक उपचार करून सांगली येथे उपचारासठी नेले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भरधाव वेगाने, अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवून अपघात केल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.
गाडीची ट्रायल घेतानाच काळाचा घाला
आदित्य आपल्या मित्राची मोटरसायकल (स्पोर्ट्स बाईक) ट्रायल साठी कॉलेज कॉर्नर पर्यंत घेऊन गेला होता, तेथून परतत असतानाच काळाने हा घाला घातला असल्याचे बोलले जात होते. अपघाताचे वृत्त समजताच पुणदी गावावर तसेच तासगावातील जोशी गल्ली परिसरात पसरली होती.