कुंडले समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचविले
कारवार : कारवार जिल्ह्यात लक्ष्मी पूजनाची लगबग सुरू असताना मंगळवारी गोकर्ण जवळच्या जगप्रसिद्ध कुंडले समुद्रकिनाऱ्यावर थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला. किनाऱ्यावर तैनात केलेल्या जीवरक्षकांनी अतुलनीय शौर्य दाखवित व स्वत:चा जीव धोक्यात घालत समुद्रात बुडणाऱ्या बेंगळूर येथील दोन युवा पर्यटकांचा जीव वाचविला. जीव वाचविण्यात आलेल्या पर्यटकांची नावे नागेश सुब्रमण्यम (वय 30) आणि गणेश कृष्णप्पा (वय 32) अशी आहेत. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, बेंगळूर येथील नऊ पर्यटक दिवाळीचा सण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी गोकर्ण जवळच्या सुप्रसिद्ध कुंडले समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले होते.
समुद्रकिनाऱ्यावर दाखल होणाऱ्या प्रत्येकाला जसा आंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी मोह आवरत नाही तसाच त्या नऊ पर्यटकांना समुद्रात उतरण्याचा मोह झाला. तथापि, मंगळवारी अमावस्या असल्याने समुद्रलाटांनी वेगवेगळे रुप धारण केले होते. नेहमीपेक्षा मंगळवारी भरतीचे प्रमाण वेगळे होते. लाटांशी मौजमजा करताना नागेश आणि गणेश या पर्यटकांना आपण लाटांच्या विळख्यात कसे सापडलो हे कळले नाही. सहकारी अडचणीत आले आहेत हे लक्षात येताच अन्य पर्यटकांमध्ये गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती कठीण होती तरी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून व धैर्य दाखवित नागेंद्र कुर्ले आणि मंजुनाथ हरिकंत्र या जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेतली आणि काही अप्रिय घडण्यापूर्वी बुडणाऱ्या दोन्ही पर्यटकांना पाण्याबाहेर काढले. यावेळी प्रवासी मित्र अखेर हरिकंत्र यानेही महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगण्यात आले.