दोन दहशतवाद्यांना सोपोरमध्ये कंठस्नान
सुरक्षा दलाला मोठे यश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुंतलेल्या सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सोपोरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सोपोर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी गुरुवारपासून मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागातील चेक मोहल्ला नौपोरा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष झाला. या चकमकीत एक नागरिक आणि दोन सैनिकही जखमी झाले आहेत. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाकडून अलर्ट
सोपोर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सशस्त्र दल आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सोपोर आणि आजूबाजूच्या परिसरात माहिती देणाऱ्यांना सक्रिय करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास सुरक्षा दल शोध घेत असताना चक लोकलमध्ये पुढे जात असताना मशिदीपासून काही अंतरावर असलेल्या एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. यापूर्वी सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात रझाक नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. अब्दुल रझाक ठाणमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदा टोप या गावातील मशिदीतून बाहेर पडत असताना ही घटना घडली होती.