For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृतसरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

06:11 AM Oct 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमृतसरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक
Advertisement

अँटी-टँक रॉकेट लाँचर जप्त : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अमृतसरमध्ये मंगळवारी दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक अँटी-टँक रॉकेट लाँचर जप्त करण्यात आले. हे दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’  ऑपरेटरच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ‘आरपीजी’ वापरून पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना होती. आता त्यांचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास सुरू आहे.

Advertisement

गुप्तचर विभागाकडून प्रात्प झालेल्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये मोठी कारवाई करत रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) आणि लाँचरसह दोघांना रंगेहात पकडले. दोन्ही दहशतवादी एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. ‘आरपीजी’ व्यतिरिक्त त्यांच्याकडून अन्य शस्त्रे व गोपनीय दस्तावेजही जप्त करण्यात आले आहेत. अमृतसर ग्रामीण विभागातील एसएसपी मनिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सीने संयुक्त मोहिमेदरम्यान ही कारवाई केली आहे. एसएसपी सिंग यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची सविस्तर माहिती दिली.

‘आयएसआय’चे हस्तक

अटक केलेल्या आरोपींची ओळख स्पष्ट झाली असून मेहकदीप सिंग उर्फ मेहक आणि आदित्य उर्फ आदि अशी त्यांची नावे असल्याची माहिती एसएसपी मनिंदर सिंग यांनी दिली. त्यांच्याकडून एक आरपीजी-22 नेट्टो अँटी-टँक रॉकेट लाँचर, एक मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे हस्तक आहेत. पैशाचे आमिष दाखवून त्यांना दहशतवादी कारवाया करण्यात गुंतवण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे.

दहशतवादी कनेक्शनचा पर्दाफाश

अटक करण्यात आलेले दहशतवादी हरप्रीत सिंग उर्फ विकी (रा. जाठोल, पोलीस स्टेशन घरिंडा) यांच्या सहकार्याने काम करत होते. विकी सध्या फिरोजपूर तुरुंगात आहे. हरप्रीत सिंगने ड्रोनद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’कडून आरपीजी-22 रॉकेट लाँचर मागवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते मेहकदीप सिंग आणि आदित्य पुरवणार होते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 3, 4, 5, स्फोटक पदार्थ कायदा आणि बीएनएस कायद्याच्या कलम 113 अंतर्गत घरिंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

विकी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार

राज्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कारागृहात कैद असलेल्या आरोपींपर्यंत पोहोचलेले आहेत. हरप्रीत सिंग उर्फ विकी विरुद्ध गेट हकीम पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फिरोजपूर तुरुंगात बंद असलेल्या विक्कीलाही चौकशीसाठी प्रोडक्शन वॉरंटवर अमृतसरला आणले जाण्याची शक्यता आहे. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अधिक माहिती शेअर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गतीने तपास सुरू असून आणखी काही सूत्रधारांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Advertisement
Tags :

.