For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दोन दहशतवादी हल्ले

06:28 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दोन दहशतवादी हल्ले
Advertisement

शोपियानमध्ये भाजप नेत्याची हत्या; अनंतनागमध्ये राजस्थानी दाम्पत्यावर गोळीबार, पती गंभीर

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी रात्री तासाभरात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. पहिली घटना अनंतनागमधील पहलगामजवळील पर्यटक शिबिरात घडली. येथे दहशतवाद्यांनी एका पर्यटक दाम्पत्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर काही वेळातच दहशतवाद्यांनी रात्री 10.30 च्या सुमारास शोपियान येथील हीरपोरामध्ये स्थानिक भाजप नेते एजाज अहमद शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली. एजाज अहमद यांना ऊग्णालयात नेले असता त्यांना मृत जाहीर करण्यात आले. या दोन्ही घटनानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करून हल्लेखोरांचा शोध घेण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशीपर्यंत हल्लेखोर सापडू शकले नाहीत.

Advertisement

पर्यटकांवर हल्ला झालेले दाम्पत्य राजस्थानमधील जयपूर येथील ब्रह्मपुरी भागातील रहिवासी आहे. चार दिवसांपूर्वी ते सुमारे 50 जणांच्या ग्रुपसोबत काश्मीरला पोहोचले होते. याचदरम्यान दोघेही रिसॉर्टमध्ये थांबले असताना त्यांना दहशतवाद्यांकडून टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव फराह असे असून तिचे पती तबरेज हे गंभीर अवस्थेत इस्पितळात उपचार घेत आहे. त्यांच्या डोक्यात गोळी लागली असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पत्नी फराहच्या छातीला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर दाम्पत्याला जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती पाहता त्यांना रात्री उशिरा जीएमसी अनंतनाग येथे रेफर करण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी दोघांनाही श्रीनगरच्या ऊग्णालयात हलवण्यात आले.

काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका होत असताना जम्मू काश्मीरमध्ये हे दोन्ही हल्ले झाले आहेत. यापूर्वी 4 मे रोजी पूंछमध्ये हवाई दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये एक जवान हुतात्मा असून जखमी झालेल्या पाच जणांवर उधमपूरच्या ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पुंछमधील शाहसीतार भागात झाला. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन गाड्यांवर जोरदार गोळीबार केला. यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दोन्ही वाहने सनई टोपकडे जात होती.

बारामुल्ला मतदारसंघात पाचव्या टप्प्यात सोमवार, 20 मे रोजी मतदान होत असतानाच नव्याने दहशतवाद्यांनी हल्ले केल्याने सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे. मतदानादरम्यान कोणत्याही घातपाती कारवाया टाळण्यासाठी सुरक्षा दल पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.

Advertisement
Tags :

.