खानापुरात एकाचवेळी दोन तहसीलदार दावेदार
तहसीलदार कार्यालयात दोन अधिकाऱ्यांत वाद : पुढील निर्णय होईपर्यंत वाद न करण्याच्या सूचना
खानापूर : खानापूर तहसीलदारपदाचा वाद बुधवारी तहसीलदार कार्यालयात रंगला होता. बदली झालेले तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालयातील थेट खुर्चीवर ताबा मिळविला. त्यानंतर काही वेळानी सध्या रुजू असलेल्या तहसीलदार मंजुळा नायक या कार्यालयात आल्यावर दोघांत वाद रंगला होता. शेवटी सायंकाळी प्रांताधिकारी नाईक यांनी हस्तक्षेप करून पुढील निर्णय येईपर्यंत दोघानीही वाद करू नये, अशी समज देवून वादावर पडदा पाडला आहे. मात्र कोमार हे मला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने मीच खानापूरचा तहसीलदार अशी ठाम भूमिका घेत आहेत. तर मंजुळा नायक माझ्या नावाने बदलीचा आदेश नसल्याने मीच खानापूरची तहसीलदार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खानापूर कार्यालयात दोन तहसीलदार कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची धारवाड उच्च न्यायालयाने एका जमिनीच्या प्रकरणात 10 डिसेंबरपर्यंत बदली करण्यात यावी, असे आदेश राज्य सचिवाना दिले होते. त्यानुसार दुंडाप्पा कोमार यांची बदली करण्यात आली होती. त्या जागी तहसीलदार म्हणून मंजुळा नायक यांची नियुक्ती करण्यात आली होती. दि. 14 नोव्हेंबर रोजी मंजुळा नायक यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर आजपर्यंत त्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. दुंडाप्पा कोमार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने धारवाड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्या आदेशाच्या आधारे बुधवारी दुपारी दुंडाप्पा कोमार हे खानापूर तहसीलदार कार्यालयात येऊन मंजुळा नायक या जेवणासाठी बाहेर गेल्या असताना तहसीलदार कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला.
यानंतर मंजुळा नायक या तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्यावर मंजुळा नायक आणि दुंडाप्पा कोमार यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यावेळी दुंडाप्पा कोमार म्हणाले, मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मीच खानापूरचा तहसीलदार असल्याने मी ताबा घेतला आहे. यावर मंजुळा नायक यांनी हा आदेश मला बंधनकारक नसल्याने मी खानापूर तहसीलदार म्हणूनच राहणार असून ताबा देणार नसल्याचे सांगितले. दोन्ही तहसीलदारामध्ये वाद झाल्यानंतर मंजुळा नायक यांनी ग्रेट टू तहसीलदार केबीनमध्ये बसून कार्यालयाचे काम पाहिले. मात्र दुंडाप्पा कोमार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना फायली माझ्याकडे सहीसाठी देण्यात याव्यात सांगितल्यानंतर दुंडाप्पा कोमार यांनी अनेक फायलीवर स्वाक्षऱ्या केल्या.
मंजुळा नायक यांची नियुक्ती रद्दबातल
यावेळी पत्रकारानी दुंडाप्पा कोमार यांना विचारले असता, मला सरकारकडून न्याय मिळाला नाही. तसेच माझ्याय झाल्याने मी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या बाजूने न्याय दिला असून माझ्याविरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे माझी झालेली बदली रद्द झाली असून मीच खानापूरचा तहसीलदार म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे मंजुळा नायक यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खानापूर तहसीलदारपदी केलेली नियुक्ती ही रद्दबातल झाली आहे. त्यामुळे मी पदभार स्वीकारलेला आहे. याबाबत मंजुळा नायक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, दुंडाप्पा कोमार यांच्याविरोधात उच्च न्यायालयाने कंटेन्ट ऑफ कोर्टच्या अनुषंगाने त्यांची बदली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल खात्याच्या राज्य सचिवानी आणि महसूल मंत्र्यांनी केली आहे.
त्यांच्या जागी माझी नियुक्ती ही महसूल विभागाच्या मुख्य सचिवानी केली आहे. दुंडाप्पा कोमार यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर आरोपावर स्थगिती दिली आहे. मात्र खानापूर तहसीलदारपदाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश नसल्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मला बंधनकारक नाही. दुंडाप्पा कोमार यांनी मी कार्यालयात नसलेले पाहून तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतला आहे. मी कार्यालयात येऊन चर्चा केली असता माझ्यावर अरेरावी करुन खुर्ची सोडण्यास नकार दिल्याने मी कार्यालयातील ग्रेट टू तहसीलदार केबीनमधून तहसीलदार कार्यालयाची धुरा सांभाळत आहे. मी याबाबत महसूल खात्याच्या राज्य सचिवाना तसेच जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लेखी माहिती दिली आहे. जर माझ्या नावे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना क्षणाचाही विलंब न लावता कोमार यांच्याकडे पदभार सोपवला असे त्या म्हणाल्या.
वाद पोहोचला वरिष्ठ पातळीतर्यंत
खानापूर तहसीलदारपदाचा वाद आता सर्वोच्च न्यायालय, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आणि महसूल खात्याच्या वरिष्ठांपर्यंत पोहचला असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कशाप्रकारे अंमलबजावणी होते. हेच आता तहसीलदारपदाचा वाद आता पहावे लागेल.
दोन्ही तहसीलदारांना संयम बाळगण्याचे आवाहन
बुधवारी खानापूर तहसीलदार कार्यालयात भुलवाद मंडळाचे न्यायालय चालते. यासाठी प्रांताधिकारी नायक हे दाखल झाले होते. न्यायालय सुरू होण्यापूर्वी दोन्ही तहसीलदाराना संयम बाळगण्याचे आवाहन करून न्यायालयात गेले होते. मात्र दोन्ही तहसीलदारानी आपापल्या केबीनमधून कारभार सुरु केल्याने कर्मचाऱ्यांत पेच निर्माण झाला होता.