वहाळातून दोघे गेले वाहून, एक सुखरुप, दुसऱ्याचा शोध सुरू
लांजा :
वहाळाच्या पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील खेगडे कुटुंबीय हे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई येथे राहतात. गणेशोत्सवानिमित्त ते गावी आले होते. यापैकी मिलिंद विजय खेगडे (28), केतन श्रीपत खेगडे (35) हे दोघे सख्खे- चुलत भाऊ असून शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान सिद्धेश्वर या देवस्थान ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना वहाळ ओलांडून पलिकडे जाताना दोघेही वहाळातून वाहून गेले.
यामध्ये केतन श्रीपत खेगडे हा वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी दुपारपासूनच युद्धपातळीवर शोधमोहीम हाती करण्यात आली होती. मात्र केतन याचा शोध लागला नव्हता. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. दरम्यान या घटनेत मिलिंद खेगडे बचावला आहे. याबाबत माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व सहकारी, तहसीलदार प्रियांका ढोले यांच्यासह सर्व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.