गुलमर्गमधील हल्ल्यात दोन जवान हुतात्मा
लष्कराच्या वाहनावर गोळीबार : दोन कुलींनीही गमावला जीव, अन्य तिघे जखमी
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गजवळ गुरुवारी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले. तसेच दोन कुलींनाही जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अन्य तिघे जखमी झाले असून त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गुलमर्गच्या नागीन भागात 18 राष्ट्रीय रायफल्सच्या (आरआर) वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. नियंत्रण रेषेपासून 5 किमी अंतरावर असलेल्या बोटपाथरी येथून लष्कराचे वाहन येत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार करत हा हल्ला चढवला.
सुरुवातीला या हल्ल्यामध्ये पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्री उशिराने जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झाले. उत्तर काश्मीरमधील गुलमर्गमधील बोटापथरी भागातील नागीन भागात ही घटना घडली. येथे लष्कराच्या वाहनावर गोळीबार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभरातील हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना थांबताना दिसत नाहीत. आता गुलमर्गमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर सदर भागात अलर्ट जारी करण्यात आला. गोळीबारानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सुरक्षा दल घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गोळीबार झाल्यानंतर लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिल्याचे समजते.