हलग्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
किराणा दुकानासह पानटपरी फोडली
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. हलगा येथे दोन दुकाने फोडण्यात आली असून सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याच परिसरातील एक हॉटेलही फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या सुरेश गुंडू कामाण्णाचे यांचे किराणा दुकान फोडून बिस्किटे, साबण, कडधान्य, पेस्ट, गुटखा आदी सुमारे 15 हजार रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य लांबविण्यात आले आहे. याच दुकानात घडलेला चोरीचा हा पाचवा प्रकार आहे. एकाही चोरीचा तपास लागला नाही. शिवाजी मल्लाप्पा बिळगोजी यांचे पानदुकानही फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी गुटखा, सिगारेटची पाकिटे व गल्ल्यातील चिल्लर रक्कम असा सुमारे 5 हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे. आठ दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या गोबीमंचुरी स्टॉलवर चोरी करण्यात आली होती. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.