For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन शॅकना आग, कामगाराचा मृत्यू

12:48 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन शॅकना आग  कामगाराचा मृत्यू
Advertisement

आगोंद-काणकोण येथील घटना

Advertisement

काणकोण - खोल : काणकोणातील आगोंद, धवलखाजन येथील किनाऱ्यावरील शिवलिंग चलवादी आणि मनोज पागी यांच्या सोलमेट आणि ओंकार या दोन  हंगामी शॅकना 25 रोजी रात्री आकस्मिक आग लागल्यामुळे जवळजवळ दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र काणकोणच्या अग्निशामक दलाच्या पथकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळी धाव घेतली आणि ज्या आस्थापनांना आग लागली होती त्यांच्या शेजारची जवळजवळ सहा  आस्थापने वाचविली. त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. या आगीत एका कामगाराला मृत्यू आला, तर 6 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. चलवादी यांच्या आस्थापनाची राखरांगोळी झाली आहे.

काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग चलवादी यांच्या आस्थापनाचे दुरूस्तीचे काम चालू होते. काम संपवून कामगार घरी गेले असता रात्री साधारणपणे 1 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची माहिती काणकोणच्या अग्निशामक दलाला मिळाली. दलाचे प्रमुख धीरज देसाई यांनी आगीची कल्पना येताच कुंकळ्ळी, कुडचडे, मडगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी 9 बंब इतके पाणी लागले. त्याचबरोबर कोट्यावधींच्या मालमत्तेचे रक्षण करण्यात काणकोणच्या अग्निशामक दलाला अन्य दलांच्या मदतीने यश आले, अशी माहिती धीरज देसाई यांनी दिली.

Advertisement

आगीचे नेमके कारण अस्पष्ट

चलवादी हे मागच्या कित्येक वर्षांपासून या किनाऱ्यावर व्यवसाय करत असून पर्यटन हंगाम संपल्यानतंर त्यांनी आपले आस्थापन बंद करून ठेवले होते आणि काही ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू होते. आकस्मिक लागलेल्या आगीत त्यांचे जवळजवळ 13 एसी युनिट, 4 फ्रीज, 7 सिलिंडर, सोफा सेट आणि अन्य महत्त्वाचे फर्निचर व साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कारणाने हे नेमके समजू शकलेले नाही.काणकोणचे पोलीस उपअधीक्षक टिकमसिंह वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिश रा. देसाई आणि अन्य तपास करत आहेत. काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालू केला आहे.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाचे उपसंचालक आर. ए. हळदणकर, विभागीय अधिकारी फ्रान्सिस्को मेंडीस, अधिकारी अशोककुमार परीट, वाहनचालक रमाकांत वेळीप, कुणाल कोमरपंत, फायर फायटर अमरेश मुखरकर, सज्जन मुडकूडकर, कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे फायर फायटर मारियो फर्नांडिस, वाहनचालक प्रयेश देसाई, फायर फायटर प्रभाकर वेळीप, जयेश जांगली, सिद्धांत अनुर्लेकर, दिनेश गावकर, मडगाव अग्निशामक दलाचे फायर फायटर आर. एस. कुटकर, रूपेश सतरकर, अनिल तेली, जगदीश सन्गर, वाहनचालक संदेश नाईक, एस. गावस देसाई, कुडचडे अग्निशामक दलाचे फायर फायटर जे. आय. कार्दोज, सागर च्यारी, गिरीश नाईक, वाहनचालक संकेत देसाई यांनी मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान,ज्या ठिकाणी ही आस्थापने चालविण्यात येत आहेत त्या ठिकाणी चार चाकी वाहने जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता ठेवण्यात आलेला नसल्यामुळे खूप अडचणीचा सामना करत अग्निशामक दलाला घटनास्थळी जावे लागले. सध्या आगीत जळालेल्या कामगाराचा मृतदेह काणकोणच्या पोलिसांनी शवचिकित्सेसाठी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास चालू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Advertisement
Tags :

.