सहकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप
अल्पवयीन मुलाची निर्दोष मुक्तता : दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
बेळगाव : लॉजमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी दोघांना दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर एका अल्पवयीन मुलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शशीकुमार रामाप्पा उद्दाप्पगोळ (वय 21) रा. हिडकल डॅम ता. हुक्केरी आणि नवीन चंद्रा शेट्टी (वय 30) रा. कोडूर ता. होसनगर जि. शिमोगा अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा निकाल दिला आहे.
विनायक चंद्रकांत रायबागकर (वय 24) रा. घटप्रभा याचा खून केल्याच्या आरोपावरून ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विनायक, शशीकुमार, नवीन व अन्य एक अल्पवयीन मुलगा आरटीओ सर्कल येथील साई लॉजमध्ये कामाला होते. 29 सप्टेंबर 2019 रोजी पहिला आरोपी शशीकुमार याचा वाढदिवस होता. त्यामुळे चौघेजण लॉजमध्ये रंगीत पार्टी करून गाण्याच्या तालावर नाचत होते. मात्र, त्यावेळी मोठा आवाज ठेवण्यात आला होता.
त्यामुळे विनायकने साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याची मागणी केली. याच कारणातून रागाच्या भरात विनायकच्या डोक्यात आरोपी शशीकुमार याने बियरच्या बाटलीने हल्ला केला. तर दोघांनी त्याला घट्ट पकडून भिंतीला त्याचे डोके आपटले. त्यानंतर त्याला बाथरुममध्ये फेकून देण्यात आले. डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. त्यानंतर तिघांनी लॉजमधील काऊंटरवर येऊन जेवण केले व तेथून पळ काढला.
नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी लॉज मालक आल्यानंतर घडला प्रकार उघडकीस आला. ही माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली. मार्केट पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता तिघांनी विनायकचा खून केल्याचे दिसून आले. पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल कऊन घेऊन पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते न्यायालयात सादर केले. आरोपींना अटक कऊन न्यायायासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
आरोपी नवीन याला जामीन मंजुर झाल्याने तो बाहेर होता. तर मुख्य आरोपी शशीकुमार हा अद्याप कारागृहातच होता. तत्कालीन तपास अधिकारी विजय मुरगुंडी व त्यांचे सहकारी शरद खानापुरी यांनी घटनास्थळी सापडलेले पुरावे, मुद्देमाल व साक्षी व्यवस्थितरित्या जमा करून ते न्यायालयासमोर सादर केले. त्यावेळी वरील दोघांवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर अल्पवयीन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. भारती होसमनी यांनी काम पाहिले.
प्रथमदर्शीची साक्ष ठरली महत्त्वाची
ज्या दिवशी वाढदिवसाची पार्टी साजरी केली जात होती. त्या दिवशी मोठ्या आवाजाने साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. त्यामुळे शेजारच्या राजपुरोहित स्वीट मार्टमध्ये झोपी गेलेल्या भरतकुमार भावरसिंग राजपुरोहित यांना आवाजाचा त्रास झाल्याने ते रात्री 12.30 च्या दरम्यान साई लॉजमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी पार्टी करणाऱ्यांना साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करा, अशी सूचना केली होती. या खटल्यात प्रथमदर्शी साक्षीदार भारतकुमार यानी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.