कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी
इंद्रप्रस्थनगर येथील घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या कळपाने चावा घेतल्याने दोन खासगी सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 5.30 च्या दरम्यान इंद्रप्रस्थनगर येथे घडली आहे. नारायण पार्सेकर (वय 58) रा. आनंदनगर वडगाव आणि तुरब सरदार देसाई (वय 52) रा. आंबेडकरनगर अनगोळ अशी जखमींची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महानगरपालिकेकडून तातडीने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नारायण पार्सेकर आणि तुरब देसाई हे दोघेजण इंद्रप्रस्थनगर येथील दोन अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून गेल्या काही वर्षांपासून सेवा बजावत आहेत. सोमवारी रात्रीदेखील ते सेवेवर होते. सकाळी 5.30 च्या दरम्यान 8 ते 10 भटक्या कुत्र्यांच्या कळपाने आपर्टमेंटमध्ये प्रवेश केला.
कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्याने कुत्र्यांनी दोघांवर हल्ला करत चावा घेण्यास सुरुवात केली. यावेळी नारायण गंभीर जखमी झाल्याने ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले तर तुरब हे देखील जखमी झाले. आरडाओरडा आणि कुत्र्यांचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली. घडला प्रकार लक्षात आल्यानंतर काहींनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी नारायण यांना अॅडमिट करून उपचार सुरू आहेत. तुरब यांच्यावर उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. घडलेल्या या घटनेमुळे इंद्रप्रस्थनगर येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती समजताच नगरसेवक नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
नगरसेवक नितीन जाधव यांनी मनपाचे वरिष्ठ पशु निरीक्षक राजू संकण्णावर यांना घटनेची माहिती देऊन इंद्रप्रस्थनगर येथील भटकी कुत्री पकडण्याची सूचना केली. काहीवेळातच संकण्णावर आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झाले. परिसरातील 5 भटकी कुत्री पकडून त्यांची श्रीनगर येथील एबीसी केंद्रात रवानगी करण्यात आली.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा संशय
इंद्रप्रस्थनगर परिसरातील 5 भटकी कुत्री पकडून त्यांना श्रीनगर येथील एबीसी केंद्रात हलविण्यात आले. यापैकी एक कुत्रा पिसाळलेला असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संशयित पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून त्याला एबीसी केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ?
शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या कळपात पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचा संशय बळावत चालला आहे. कारण 4 दिवसांपूर्वी महात्मा फुले रोडवर संशयित पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून त्याला श्रीनगर येथील एबीसी केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र त्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. रॅबिजची लागण झालेला कुत्रा काही दिवसात मरण पावतो. त्यामुळे महात्मा फुले रोडवर पकडलेल्या कुत्र्याचा रॅबिजमुळेच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यातच मंगळवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात आल्याने पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.