मुतगे येथे दोन भाताच्या गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी
वार्ताहर/सांबरा
मुतगे (ता. बेळगाव) येथे दोन भाताच्या गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना मंगळवार दि. 2 रोजी सकाळी उघडकीस आली. मुतगे येथील शेतकरी यल्लाप्पा गुंडू केदार यांच्या मालकीच्या दोन भाताच्या गंज्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी विजयालक्ष्मी यांना कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यल्लाप्पा केदार यांनी मंगळवारी मळणी करण्याची सर्व तयारी केली होती. मंगळवारी सकाळी शेतात गेले असता भाताच्या गंज्यांना आग लागण्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर इतर शेतकरीही घटनास्थळी जमा झाले. सोमवारी मध्यरात्रीनंतर गवत गंज्यांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केदार कुटुंबीयांनी केली आहे.