भारतीय महिला क्रिकेट संघाचे दोन सराव सामने
वृत्तसंस्था/दुबई
संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी सराव सामन्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून त्यामध्ये भारताचे दोन सामने होणार आहेत. या सराव सामन्याच्या वेळापत्रकांनुसार भारताचा पहिला सामना 29 सप्टेंबर विंडीजबरोबर तर दुसरा सामना 1 ऑक्टोबरला द. आफ्रिकाबरोबर होणार आहे.
घोषित करण्यात आलेल्या सराव सामन्यांना मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून 1 ऑक्टोबरला हे सरावाचे सामने संपणार आहेत. 2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व म्हणजे 10 संघ पात्र ठरले आहेत. या सर्व संघांकरिता सरावाचे सामने आयोजित केले आहेत. प्रत्येक संघ दोन सरावाचे सामने खेळणार असून हे सामने प्रत्येकी 20 षटकांचे आहेत. या सरावांच्या सामन्यांतील खेळाडूंच्या कामगिरीची अधिकृत नोंद होणार नाही. कारण या सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी-20 चा दर्जा दिलेला नाही.
अ गटामध्ये विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका तर ब गटामध्ये इंग्लंड, द. आफ्रिका, विंडीज, स्कॉटलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. 28 सप्टेंबरला पाक आणि स्कॉटलंड तसेच लंका आणि बांगलादेश यांच्यात सरावाचे सामने होणार आहेत. 29 तारखेला न्यूझीलंड आणि द. आफ्रिका तसेच भारत आणि विंडीज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामने होतील. 30 सप्टेंबरला लंका-स्कॉटलंड, बांगलादेश-पाकिस्तान असे सामने होणार आहेत. 1 ऑक्टोबरला विंडीज-ऑस्ट्रेलिया, इंग्लंड-न्यूझीलंड, भारत-द. आफ्रिका यांच्यात या लढती खेळविल्या जातील.
गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करुन सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र भारताने या स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. दरम्यान त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव पत्करावा लागला होता. 2024 ची ही स्पर्धा यापूर्वी बांगलादेशमध्ये घेण्याचे ठरले होते. पण बांगलादेशमधील सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे या स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले आणि आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. अबुधाबी येथे चालु वर्षांच्या प्रारंभी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेतून लंका आणि स्कॉटलंड या दोन संघांनी आपली पात्रता सिद्ध केली. आगामी स्पर्धेत प्रत्येक संघ प्राथमिक गटात 4 सामने खेळणार असून या गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबरला तर अंतिम सामना 20 ऑक्टोबरला दुबईत खेळविला जाणार आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्याची माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली.