बारा हजाराची लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना अटक
चिकोडी येथे लोकायुक्त अधिकाऱ्यांची कारवाई
बेळगाव : नव्या पेट्रोलपंपसाठी एनओसी देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिकोडी येथील दोघा अधिकाऱ्यांना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. कुसनाळ (ता. कागवाड) येथील सागर गुराप्पा दोडमनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकोडी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शोभा लक्ष्मण पोळ व डाटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी कर्मचारी) प्रवीण अनंत दोडमनी या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
सागर दोडमनी यांना कुसनाळ येथे पेट्रोलपंप सुरू करायचा होता. एनओसी देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिकोडी येथील कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. त्यासाठी 12 हजार रुपये लाच मागण्यात आली होती. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर, पोलीस निरीक्षक संगमनाथ होसमनी व मंजु कानपेठ, रवी मावरकर, राजश्री भोसले, गिरीश पाटील, लगमण्णा होसमनी, संतोष बेडग, शशी देवरमनी, अमोल कोरव, के. एस. काजगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून अधिकारी व डाटा एंट्री ऑपरेटरला अटक केली आहे.