For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जग्वार विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

06:55 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
जग्वार विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
Advertisement

राजस्थान-चुरु येथे दुर्घटना : हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

Advertisement

वृत्तसंस्था / चुरु

राजस्थानमधील चुरु जिह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी एक जग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, अपघाताचे कारण शोधण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीत विमान कसे कोसळले याचा तपशीलवार आढावा घेतला जाईल. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. प्राथमिक तपास पूर्ण केल्यानंतर लष्कर अधिकृत निवेदन जारी करणार आहे.

Advertisement

भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान प्रशिक्षण उ•ाणावर असताना हा अपघात झाला. बुधवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी विमान कोसळल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अपघातानंतर जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा यांच्यासह पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी पोहोचली. तसेच लष्कराचे मदत व तपास पथकही घटनास्थळी पोहोचले होते.

विमानाचे अवशेष वैमानिकांच्या मृतदेहांसोबत एका शेतात सापडले आहेत. मृतदेह अत्यंत जळलेल्या अवस्थेत दिसून आले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांची नावे तातडीने जाहीर करण्यात आली नव्हती. विमान कोसळल्यानंतर कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे.

पाच महिन्यातील तिसरी घटना

गेल्या पाच महिन्यांत अशापद्धतीने सुरक्षा दलाचे विमान कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी अंबाला येथे आणि 3 एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे एक जग्वार प्रशिक्षण विमान कोसळले होते. अंबाला येथे पायलट सुरक्षितपणे बाहेर पडू शकला होता, परंतु जामनगर अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला होता. तसेच आतापर्यंत जग्वार लढाऊ विमाने एकूण 50 मोठ्या आणि किरकोळ अपघातांना बळी पडली आहेत. 2012 पासून 6 मोठे अपघात झाले आहेत.

Advertisement
Tags :

.