For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वन्यप्राण्यांची शिकार करणारे दोघेजण जाळ्यात?

12:52 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
वन्यप्राण्यांची शिकार करणारे दोघेजण जाळ्यात
Advertisement

वनविभागाच्या विशेष पथकाची बेळगाव परिसरात कारवाई : दांडेली परिसरात केली शिकार

Advertisement

बेळगाव : दोन वर्षांपूर्वी दांडेलीजवळील जंगलात वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या आरोपावरून वनविभागाच्या बेंगळूर येथील विशेष पथकाने बेळगाव येथील दोघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप चौकशी सुरू असल्यामुळे अधिकाऱ्यांनी यासंबंधी गुप्तता बाळगली आहे. बेळगाव तालुक्यातील एका धाबा चालकाला ताब्यात घेण्यात आले असून शहराच्या मध्यवर्ती भागातील एका युवकालाही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. तानाजी गल्ली परिसरातील एका घरात विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. या दोघा जणांना पुढील चौकशीसाठी दांडेलीला नेण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात वनविभागाचे विशेष पथक तळ ठोकून होते. दोन वर्षांपूर्वी दांडेली परिसरात एका वन्यप्राण्याची शिकार करण्यात आली आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रावरून अधिकारी शिकाऱ्यांचा शोध घेत बेळगावला पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. तानाजी गल्ली व अतिवाड गावाजवळ परिसरात विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी या शिकाऱ्यांविषयी माहिती जमविली आहे.दांडेली परिसरातील एका जुन्या शिकऱ्याचाही या प्रकरणात सहभाग असून बेळगाव येथील एकाच कुटुंबातील दोघा जणांचा शोध घेण्यात येत होता.

Advertisement

एक युवक वनविभागाच्या तावडीत सापडला असून दुसऱ्याने पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दांडेली परिसरात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एक-दोन दिवसात संपूर्ण माहिती उजेडात येणार आहे. वनविभागाच्या विशेष पथकाने ज्या दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. ते अधुनमधून शिकारीसाठी दांडेलीला जात होते, अशी माहिती मिळाली असून या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. वाघ नखे विक्री प्रकरणातही बेळगावच्या शिकाऱ्यांचा सहभाग आहे का? हे पडताळून पाहण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.