ओला इलेक्ट्रिकच्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे
अंशुल खंडेलवाल, सुवोनील चॅटर्जी यांचा समावेश : खर्च कपातीवर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये मुख्य विपणन अधिकारी अंशुल खंडेलवाल आणि मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी सुवोनील चॅटर्जी यांचा समावेश आहे.
27 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तेव्हापासून ते कंपनीमध्ये नसणार आहेत. ओला इलेक्ट्रीक कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामागचे कारण मात्र समजले नाही.
धोरणात्मक बदलावर भर
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावीश अग्रवाल यांनी कंपनीमध्ये धोरणात्मक बदलाच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती पावले उचलायला सुरुवात केली असून गेल्या काही महिन्यापासून ते विविध स्तरावर बदल करण्यात गुंतलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबतचे धोरण कंपनी राबवत असून जवळपास 12 टक्के इतके कर्मचारी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे. खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने कंपनी आगामी काळातही असे निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे.
कर्मचारी कपातीचे धोरण
आगामी काळामध्ये 500 कर्मचारी कमी केले जाण्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच कंपनीने 4000 स्टोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीतच कंपनीने जवळपास 3299 स्टोअर्सची भर घातली आहे. टायर वन, टायर टू शहरांसोबतच प्रत्येक शहरात विस्तार करणार आहे.