दोन कुख्यात गँगस्टर्सना अमेरिकेत अटक
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील भानू राणाचा समावेश
► वृत्तसंस्था/ जॉर्जिया
भारतीय सुरक्षा यंत्रणांना परदेशात मोठे यश मिळाले आहे. व्यंकटेश गर्ग आणि भानू राणा या दोन कुख्यात गँगस्टर्सना अमेरिकेतील जॉर्जियामध्ये अटक करण्यात आली आहे. प्रत्यार्पण धोरणाअंतर्गत लवकरच दोघांनाही भारताच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे समजते. हे गँगस्टर्स गुन्हेगारी सिंडिकेट चालवण्यासाठी परदेशातील तरुणांना भरती करत होते.
अमेरिकेत अटक करण्यात आलेला गँगस्टर भानू राणा हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. तो बऱ्याच काळापासून अमेरिकेत राहत होता. तो मूळचा हरियाणातील करनाल येथील असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो बऱ्याच काळापासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असून दिल्ली, पंजाब आणि हरियाणापर्यंत त्याचे नेटवर्क पसरले आहे. पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्याच्या तपासातही त्याचे नाव समोर आले होते.
गँगस्टर व्यंकटेश गर्गवर भारतात 10 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. तो हरियाणातील नारायणगडचा रहिवासी आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये राहत असताना तो उत्तर भारतातील तरुणांना त्याच्या टोळीत भरती करत होता. गुरुग्राममध्ये बहुजन समाज पक्षाच्या सदस्याच्या हत्येत त्याचे नाव समोर आल्यानंतर व्यंकटेश जॉर्जियाला पळून गेला. तेथे तो कपिल सांगवान नावाच्या दुसऱ्या गँगस्टर्ससह खंडणी रॅकेट चालवत होता.