काश्मीरमध्ये दोन मजुरांची दहशतवाद्यांकडून हत्या
गांदरबलमध्ये हल्ला, भुयारी मार्गाचे काम करणारे कामगार लक्ष्यस्थानी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिह्यातील सोनमर्ग भागात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. हा हल्ला बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ झाला. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले. मृत झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून पंजाबस्थित गुरमीत सिंग असे त्याचे नाव आहे. याव्यतिरिक्त एका बिहारी मजुरासह तिघा स्थानिकांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या घटनेची माहिती देताना दोन जण ठार झाले असून अन्य दोन-तीन मजूर जखमी झाल्याचे सांगितले. नाकाबंदी करून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मध्य काश्मीरमधील गांदरबल जिह्यातील गगनीर ते सोनमर्गला जोडणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथे काम करणाऱ्या कामगारांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात प्राथमिक टप्प्यात दोघेजण ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाचे पथक हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी परिसराला वेढा घातला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू केला आहे.
बिहारमधील मजुराची दोन दिवसांपूर्वी हत्या
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिह्यात बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या दोन दिवसानंतर ही घटना घडली आहे. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून परप्रांतीय लोकांच्या हत्येच्या घटनांमुळे परिसरात चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यातही दोन बिगर स्थानिक मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.