ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचा मृत्यू
तिघे जखमी : पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोरही ठार
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील मँचेस्टर येथे गुरुवारी रात्री यहुदींच्या एका प्रार्थनास्थळाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तसेच अन्य तीन जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी एका संशयितालाही गोळीबारात ठार केले. ‘योम किप्पूर’ साजरा करण्यासाठी लोक एका सिनेगॉगमध्ये जमले असताना हा हल्ला झाला. ‘योम किप्पूर’चा दिवस हा ज्यू कॅलेंडरमधील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. इस्रायलने या हल्ल्याचा निषेध केला आहे
उत्तर ब्रिटनच्या क्रम्पसॉल परिसरातील मिडलटन रोडवरील हीटन पार्क हिब्रू कॉंग्रेगेशन सिनेगॉगमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला या हल्ल्याचे वर्णन ‘मोठी दहशतवादी घटना’ असे केले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या दहशतवादविरोधी कमांडने या हल्ल्यासंदर्भात दोघांना अटक केली असून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.