मोटारसायकल-कंटेनर अपघातात दोघे ठार
यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवतीजवळील दुर्घटना
कारवार : मोटारसायकल आणि कंटेनर लॉरी दरम्यान झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवती जवळ घडली. अपघातात ठार झालेल्यांची नावे छायाप्पा अनंत सोनापूरकर (वय 47) आणि प्रभाकर गंगाधर सोनापूरकर (वय 45, रा. दोघेही बैलंदूर, ता. यल्लापूर) अशी आहेत. यापैकी छायाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरील सहप्रवासी प्रभाकर याला उपचारासाठी किम्सकडे (हुबळी) नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती, यल्लापूर तालुक्यातील बैलंदूर येथील छायाप्पा सोनापूरकर आणि प्रभाकर सोनापूरकर मोटारसायकलवरून किरवतीहून यल्लापूरकडे अतिवेगाने निघालेले असताना किरवती जवळच्या गवळीवाडा येथे यल्लापूरहून हुबळीकडे निघालेल्या कंटेनरला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, मोटारसायकल चालक छायाप्पा यांच्या अंगावरून कंटेनर लॉरीचे चाक गेले आणि तो जागीच ठार झाला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या प्रभाकर सोनापूरकर याला यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयाकडे नेण्यात येत होते. तथापि वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.