यात्रेच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दलित समाजाच्यावतीने लोणंद पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले.
सातारा (तरडगाव) : फलटण तालुक्यातील तरडगाव येथे एका नामांकित हायस्कूलच्या मैदानात (ता. 30 एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजता दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना घडली. या घटनेप्रकरणी दोन्ही गटांकडून लोणंद पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दलित समाजाच्यावतीने लोणंद पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष वसंत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरडगावची यात्रा होती. त्यासाठी गावातील महिलांकरता महाराष्ट्र गौरव यात्रा हा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी प्रतिक ऊर्फ भैयाकुमार गायकवाड हा दारू पिऊन नाचत असल्याने संतोष गायकवाड, यात्रा कमिटीचे सदस्य प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष कुंभार यांनी तुम्ही नाचू नका, शांत बसून कार्यक्रम पहा अशी विनंती केली. यानंतर प्रतिकने ऐकून न ऐकल्यासारखे केल्याने संतोष याने प्रतिकला बाजूला घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर चिडून प्रतिक गायकवाड, सुमेधा गायकवाड, बादल गायकवाड, सुहास गायकवाड, अजय ननावरे, आयुष्य बनसोडे व इतर पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली.
करुणा गायकवाड (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भैरवनाथ यात्रा असल्याने ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे बादल गायकवाड हा उभा राहून नाचत होता. म्हणून ओंकार गायकवाड, आदित्य गायकवाड, अक्षय गायकवाड, संतोष गायकवाड, प्रदीप गायकवाड, मयूर गायकवाड, यश अडसूळ, अक्षय हिवरकर, राहुल गायकवाड, सुदाम गायकवाड, तुकाराम गायकवाड, सौरभ गायकवाड, धीरज गायकवाड, महेश गायकवाड, रणजित गायकवाड, सागर गायकवाड व इतर आठ ते दहा जणांनी मारहाण केली. हा वाद सोडवण्याकरता करुणा गायकवाड गेल्या असता त्यांनाही मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले. या प्रकरणी गुरुवारी रात्री दलित समाजाच्यावतीने लोणंद पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.