पार्थ मानेला दोन सुवर्णपदके
भ्आयएसएसएफ कनिष्ठ विश्व नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था / लिमा, पेरू
भारताच्या पार्थ राकेश मानेला आयएसएसएफ कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशित नेमबाजीत दुहेरी बहुमान मिळाला. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणि सांघिक विभागातही सुवर्णपदके त्याने पटकावली. याच क्रीडा प्रकारात कनिष्ठ महिला संघानेही सुवर्ण पटकावले. पदकतक्त्यात 5 सुवर्णपदकांसह भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे.
10 मी. एअर रायफल नेमबाजीच्या रोमांचक ठरलेल्या अंतिम फेरीत 24 शॉट्स घेण्यात आले. त्यात 16 वर्षीय पार्थने 250.7 गुण घेत सुवर्ण पटकावताना चीनचा आशियाई चॅम्पियन हुआंग लिवानलिनला केवळ 0.7 गुणांनी मागे टाकले. अमेरिकेच्या ब्रॅडेन पेइजरने या प्रकारात कांस्यपदक मिळविले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेल्या स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर विद्यमान डबल ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन रोमेन ऑफ्रेरेला सहावे स्थान मिळाले. पार्थचे सहकारी अजय मलिक व 15 वर्षीय अभिनव शॉ यांना पाचवे व सातवे स्थान मिळाले. अजयला शूटऑफमध्ये लिंडग्रेनकडून पराभव स्वीकारावा लागला. अभिनवने 186.7 गुण नोंदवल्याने सातवे स्थान मिळविले. अभिनवने 144.2 गुण घेतले. सांघिक नेमबाजीतही पार्थला सुवर्ण मिळाले. दिवसातील तिसरे सुवर्ण गौतमी भानोत शांभवी क्षीरसागर व अनुष्का ठाकुर यांनी हे पदक पटकावले.
त्याआधी झालेल्या पात्रता फेरीत 62 नेमबाजांनी भाग घेतला होता. 60 शॉट्सनंतर भारताच्या अजय मलिकने 628.8 गुण घेत पहिले, पार्थ मानेने 627.7 गुणांसह चौथे, अभिनव शॉने 627.0 गुण घेत सहावे स्थान मिळविले. या तिघांची मिळून एकूण गुणसंख्या 1883.5 झाली. त्यांनी अमेरिका (1877.6) संघाने रौप्य व जर्मनी (1873.9) संघाने कांस्यपदक मिळविले. यात सहभागी झालेल्या अन्य दोन भारतीय नेमबाजांना अनुक्रमे 13 व 14 वे स्थान मिळाले. उमामहेश मद्दिनेनीने 625.5 तर तलवार सिंगने 625.2 गुण मिळविले.
तीन भारतीय महिलांनीही एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना वैयक्तिक पदक मिळविता आले नाही. गौतमीने 90 जणांच्या पात्रता फेरीत 634.7 गुण घेत दुसरे स्थान मिळविले. चीनच्या वांग झिफेइने ज्युनियर विभागात नवा विश्वविक्रम नोंदवत अग्रस्थान मिळविताना 635.7 गुण नोंदवले होते. शांभवी क्षीरसागरने (632.6), चौथे, ओजस्वी ठाकुरने (631.4) पाचवे, अनुष्का ठाकुरने 17 वे, सौम्या खेडकरने 20 वे स्थान मिळविले होते. अंतिम फेरीत गौतमीला चौथे स्थान मिळविले. कांस्यविजेत्या अमेरिकेच्या नेमबाजाने तिच्यावर केवळ 0.2 गुणांनी मात केली. नंतर मात्र गौतमी, शांभवी (188.4), अनुष्का ठाकुर यांनी सांघिक विभागात मात्र सुवर्ण मिळविताना अमेरिकन संघाला पराभूत केले. भारतीय त्रिकुटाने 1894.8 गुणांचा नवा विक्रम नोंदवला. नॉर्वेला तिसरे स्थान मिळाले.
भारताच्या कनिष्ठ पुरुष व महिला संघांनी स्कीट नेमबाजीतही भाग घेतला होता. पण एकालाही अंतिम फेरी गाठता आली नाही. गुरफतेह सिंग संधूने पात्रता फेरीत 29 वे, भवतेग सिंग गिलने 31 वे, हरमेहर सिंग लालीला 44 वे स्थान मिळाले. महिलांमध्ये मानसी रघुवंशीने 109 गुणांसह आठवे स्थान मिळाले. ती एक गुण कमी मिळाल्याने तिला अंतिम फेरी गाठता आली नाही.