मुंबई कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व
अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी : दिवसअखेरीस 4 बाद 86 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत-न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली पण दिवसअखेर पुन्हा भारताने चाहत्यांना निराश केले. रविंद्र जडेजा (5 बळी) व वॉशिंग्टन सुंदर (4 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर किवीज संघाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारताने पहिल्याच दिवशी 4 विकेट्स गमावल्या. भारताने अवघ्या 9 चेंडूत 3 विकेट्स गमावल्या. भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 86 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 31 तर ऋषभ पंत 1 धावांवर खेळत होता.
प्रारंभी, नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाशदीपने किवी संघाला पहिला धक्का दिला. त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. यानंतर टॉम लॅथम आणि विल यंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी झाली. सुंदरने लॅथमला (28 धावा) बोल्ड करत ही भागीदारी मोडली. युवा खेळाडू रचिन रवींद्रही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. रचिन 5 धावा करून बाद झाला. रचिनलाही सुंदरने बोल्ड केले. 72 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्यात 87 धावांची भागीदारी झाली. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. यंगने अर्धशतकी खेळी साकारताना 138 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 71 धावा केल्या. त्याला जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला.
वानखेडेवर जडेजा, सुंदरचा धमाका
यंग बाद झाल्यानंतर मात्र किवी संघाने सातत्याने विकेट गमावल्या. यंगपाठोपाठ जडेजाने याच षटकात ब्लंडेलला माघारी धाडले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. ग्लेन फिलिप्स व मिशेलने काही काळ तग धरण्याचा प्रयत्न केला पण जडेजा व सुंदरच्या फिरकीपुढे हे खेळाडू चांगलेच हतबल दिसले. 17 धावांवर फिलिप्सला जडेजाने बोल्ड करत भारताला सातवे यश मिळवून दिले. मिशेलही सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 129 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारासह 82 धावांचे योगदान दिले. मिशेल बाद झाल्यानंतर मॅट हेन्री (0), एजाज पटेल (7) हे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले व किवीज संघाचा पहिला डाव 65.4 षटकांत 235 धावांवर संपला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स, वॉशिंग्टन सुंदरने 4 तर आकाशदीपने 1 विकेट घेतली. कसोटीतील पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळवता आली नाही.
न्यूझीलंडचा जोरदार पलटवार, टीम इंडियाची घसरगुंडी
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा रोहितने चाहत्यांना निराश केले. रोहित शर्मा 18 चेंडू 18 धावा करत मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर जैस्वाल व शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच जैस्वाल एजाज पटेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारायला गेला आणि क्लीन बोल्ड झाला. जैस्वालने 4 चौकारासह 30 धावा फटकावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही मिनिट बाकी होती, त्यामुळे भारतीय संघाने नाईट वॉचमन म्हणून मोहम्मद सिराजला फलंदाजीसाठी पाठवले. पण एजाज पटेलच्या पहिल्याच चेंडूवर तो पायचीत झाला. यानंतर रचिन रवींद्रच्या पुढील षटकात विराट कोहली फलंदाजी करत होता. ज्याने चौकार लगावत आपले खाते उघडले. पण पुढच्याच चेंडूवर विराट विचित्र पद्धतीने धावबाद झाला. यासह फक्त 9 चेंडूत भारताने 3 विकेट्स गमावल्या. एकवेळ भारताची 1 बाद 78 अशी स्थिती होती पण पुढील दोन षटकात भारताची 4 बाद 86 अशी अवस्था झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 19 षटकांत 4 बाद 86 धावा केल्या आहेत. गिल 31 तर ऋषभ 1 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 65.4 षटकांत सर्वबाद 235 (लॅथम 28, विल यंग 71, मिशेल 82, जडेजा 5 तर सुंदर 4 बळी).
भारत पहिला डाव 19 षटकांत 4 बाद 86 (जैस्वाल 30, रोहित शर्मा 18, सिराज 0, विराट कोहली 4, गिल खेळत आहे 31, ऋषभ पंत खेळत आहे 1, एजाज पटेल 2 बळी तर मॅट हेन्री 1 बळी).
जडेजाने मोडला झहीर-इशांतचा विक्रम, कपिल देव यांनाही टाकले मागे
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत जडेजाने पाच बळी घेत झहीर खान व इशांत शर्मा यांना मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जडेजा आता पाचव्या स्थानावर आला आहे. ज•tने झहीर खान आणि इशांत शर्मा या दोघांनाही मागे टाकले आहे. ज•tच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 312 विकेट्स आहेत. याचबरोबर झहीर आणि इशांतने या फॉरमॅटमध्ये 311 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे (619) आहे.
तिसऱ्या कसोटीतून जसप्रीत बुमराह बाहेर
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. बुमराहला व्हायरल इन्फेक्शन झाले असल्यामुळे तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे रोहितने सांगितले.