For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे खुले

01:23 PM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे खुले
Advertisement

जलाशय पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम : दोन दरवाजे सहा इंचाने उचलले

Advertisement

वार्ताहर /तुडये

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जलाशयाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ जादा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शहर पाणीपुरवठा मंडळाने वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी क्र. 2 व क्र. 5 हे दोन दरवाजे दुपारी सहा इंचाने उचलले आहेत. त्यामुळे मार्केंडेय नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला मिळणाऱ्या सर्वच नाल्यांना पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी असलेल्या 2473.10 फूट पाणीपातळीत वाढ होत शुक्रवारी सकाळी पाणीपातळी 2473.70 फूट नोंद झाली. शुक्रवारी सायंकाळी पाणीपातळी 2474.60 फूट झाली आहे. तर सहा इंचाने दोन दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जलाशयाची पूर्ण क्षमता पाणीपातळी 2475 फूट भरण्यासाठी नाममात्र पाणीपातळीची गरज आहे. जलाशयाला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा ओघ पाहून दरवाजे उचलण्याची तयारी बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाने ठेवली आहे.

Advertisement

यावर्षी सर्वात कमी पाणी पातळी (निचांकी) दि. 20-06-2024 रोजी 2451.00 फूट होती. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी पाणीपातळी 2452.30 फूट होती. जुलै महिन्याच्या 19 दिवसांत 22.30 फूट पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण 29 फुटाचा पाणीसाठा बेळगाव शहराला पुरवठा करण्यासाठी जलाशयात उपलब्ध झाला आहे. जून महिन्यात या परिसरात पावसाने ओढ दिली होती. 248.3 मि.मी. पाऊस जून महिन्यात झाला. तर जुलै महिन्यात आजपर्यंत 711.2 मि.मी. पाऊस झाला. दि. 4 जुलै रोजी सर्वात जादा 116.2 मि. मी. तर त्यापाठोपाठ शुक्रवारी 72.2 मि. मी. पाऊस झाला आहे. एकूण 1110. 1 मि. मी. पाऊस झाला आहे. जलाशय तुडुंब झाल्याने बेळगाव शहराची पाण्याची समस्या आता दूर झाली आहे.

मनपा आयुक्तांची जलाशयाला भेट देवून पाहणी 

जलाशयाला मिळणारे सर्व नाले मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आणत आहेत. त्यामुळे जलाशयाची पाणीपातळी तासागणिक वाढत आहे. प्रत्येक दोन तासांनी पाण्याची पातळी पाहून दरवाजे उचलून पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. पाणीपातळी 2475 फुटावरच नियंत्रित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलाशयाचे उपकार्यकारी अभियंता टी. एन. मंजुनाथ यांनी दिली.

Advertisement
Tags :

.