सांगलीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडून ६ लाखांचे दागिने लंपास
संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: श्वान परिसरातच घुटमळले
सांगली प्रतिनिधी
सांगली-माधवनगर रोडवरील घनश्यामनगर येथील वरद-विश्व या अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण सहा लाख 12 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संजयनगर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. घरफोडी झालेल्या परिसरातच श्वान घुटमुळले आहे. चोरट्यांनी एका फ्लॅटमधून नऊ तोळे आणि एक फ्लॅटमधून साडेतीन तोळ्याचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत माहिती अशी की, घनश्यामनगर येथे मुख्य रस्त्याजवळच असणाऱ्या वरद-विश्व या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर नितीन संभाजी पाटील हे कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ते कामानिमित्त फ्लॅटला पुलुप लावून ते बाहेर गेले होते. दुपारी परत आल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून आणि कडी-कोयंडा उचकटल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. संजयनगर पोलिसांनी येवून पाहणी केली आणि त्यांनी तात्काळ श्वान पथकाला बोलविले. श्वान पथक मात्र या परिसरातच घुटमुळले.
नितीन पाटील यांनी त्यांच्या घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या तिजोरीच्या लॉकरमधील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने आणि रोख 17 हजार 500 रूपये चोरट्यांनी चोरून नेले. संजयनगर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच नांद्रे, वसगडे या परिसरात छापेमारीही केली आहे. पण त्यांना रात्री उशिरापर्यंत चोरटे मिळून आले नाहीत.
दरम्यान नितीन पाटील यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात पाच लाख 17 हजाराचा ऐवज चोरी गेल्याची नोंद केली आहे. याचा अधिक तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बयाजी कुरळे करत आहेत. पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने नेत असताना इतर साहित्यही नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे सर्व साहित्य विस्कटलेले आढळून आले. तसेच ही चोरी सराईत गुन्हेगारांकडून करण्यात आली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपासही सुरू केला आहे. याशिवाय याठिकाणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि पथकानेही येवून पाहणी केली आहे. तसेच ठसे तज्ञांकडूनही याठिकाणचे ठसे घेण्यात आले आहेत.
भरदिवसा फ्लॅट फोडल्याने चिंता वाढली
गेल्या काही दिवसापासून सांगली शहरात भरदिवसा फ्लॅट फोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून घनश्यामनगर या परिसरातील वाहतूक कमी असल्यामुळे या भागात शांतता असते त्यामुळे चोरट्यांनी हा फ्लॅट फोडला आहे.