‘तरुण भारत संवाद’च्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू
कारची दुचाकीला जोरदार धडक
सातारा : पुणे-बेंगळूर महामार्गावर जोशी विहीर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय 45, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय 38, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारत संवादमध्ये वितरण विभागात कार्यरत होते. मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही उडून दूर फेकले गेले. महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून क्विड कार ही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनमध्ये येत हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरूनच क्विड कारचालक अनियंत्रित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, साताऱ्याच्या नाट्याक्षेत्रातील अनेक कलाकारांनी गर्दी केली होती. साताऱ्याच्या नाट्या क्षेत्रात मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते. त्यांनी काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता. मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजंती, पत्नी मयुरा, दोन मुले मितेश आणि मिहीर असा परिवार आहे. धिरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई असा परिवार आहे. मंदार कोल्हटकर यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. 19 रोजी संगममाहुली येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर धिरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ढवळी याठिकाणी होणार आहे. या दोघांच्या अपघाताने तरुण भारत परिवार, साताऱ्यातील नाट्याकर्मी व वृत्तपत्र कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.