For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन हुकुमशाहांची भेट : जगाच्या चिंता वाढल्या

06:11 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन हुकुमशाहांची भेट   जगाच्या चिंता वाढल्या
Advertisement

युक्रेन युद्धास लवकरच अडीच वर्षे होतील. तरीही हे युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत युक्रेनवर आक्रमण करणारे रशियाचे हुकूमशहा ब्लादीमीर पुतिन यांनी नुकतीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेतली. 24 वर्षानंतर प्रथमच पुतिन यांनी हा उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. प्राथमिक भेटीत उभयतांनी दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक आणि व्यापारी संबंध दृढ करण्यावर भर दिल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

जगात देशोदेशींचे प्रमुख नेते परस्परांना भेटण्यासाठी दौरे करीत असतात. त्यातही लोकशाही देशांचे प्रमुख जेव्हा परस्परांची भेट घेतात तेव्हा या भेटीत प्रामुख्याने व्यापार, संरक्षण, पर्यावरण, जागतिक शांततेसाठी सहकार्य असे मुद्दे असतात. खरीखुरी लोकशाही ज्या देशात सर्वसाधारणपणे नांदत असते त्या देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारे प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधणे जागतिक हितासाठी व स्थैर्यासाठी आवश्यक असते. परंतु जागतिक समुदायाची पर्वा न करता मनमानी करणारे, आक्रमक स्वभावाचे, हुकूमशहा जेव्हा परस्परांची भेट घेतात तेंव्हा त्यांच्यातील वाटाघाटीतून नवे संकट तरी उभे राहते किंवा त्यांनी आधीच निर्माण केलेले संकट अधिकच गहीरे होते.

युक्रेन युद्धास लवकरच अडीच वर्षे होतील. तरीही हे युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत युक्रेनवर आक्रमण करणारे रशियाचे हुकूमशहा ब्लादीमीर पुतिन यांनी नुकतीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेतली. 24 वर्षानंतर प्रथमच पुतिन यांनी हा उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. 2000 साली पहिल्यांदा रशियाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी उ. कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी किम जोंग उन यांचे वडील उ. कोरियाचे सत्ताधिश होते. याउलट उ. कोरियाचे सत्ताधीश किम जोंग उन यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने किम जोंग उन यांनी हा दौरा उ. कोरियाचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम वाढविण्यासाठी रशियाकडून संवेदनशील तंत्रज्ञान मिळवण्यासाठी केला आहे. या अर्थाची टीका केली होती. त्यात तथ्यही होते. कारण यानंतर उ. कोरियाने लांब पल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या करुन जगभरात घबराट निर्माण केली होती. त्यानंतर उ. कोरियाने ‘अवकाश रक्षक’ नावाचा एक लष्करी उपग्रह अवकाशात सोडून त्याने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील महत्त्वपूर्ण लष्करी व राजकीय स्थळांची इत्यंभूत माहिती मिळवल्याचा दावा केला होता. या दरम्यान उत्तर कोरियाने जागतिक निर्बंध झुगारुन दारुगोळ्याची मोठ्या प्रमाणात निर्यात रशियासाठी केली होती जी रशियास युक्रेन युद्धात कामी आली होती.

Advertisement

सध्या युक्रेनशी युद्ध सुरु असताना रशियास बऱ्याच प्रमाणात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. ही कमतरता उत्तर कोरिया भागवू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून रशिया, उ. कोरियन कामगारांचा वापर स्वस्त आणि विश्वासार्ह श्रमशक्ती मानून करीत आला आहे. आजही हजारो उ. कोरियन कामगार रशियात कार्यरत आहेत. रशियास अशा अधिक कामगारांची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे उ. कोरिया त्यांच्या अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम, क्षेपणास्त्र चाचण्या, अमेरिका व द. कोरियावर हल्याच्या धमक्या यामुळे गेली अनेक वर्षे जागतिक निर्बधांचा सामना करीत आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. इंधन व अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी या समस्यांनी उग्ररुप धारण केले आहे. जागतिक पटलावर एकाकी पडल्याने चीन व्यतिरीक्त इतर देश उ. कोरियास मदत करण्यास तयार नाहीत. अशावेळी हा देश रशियाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून आहे. दुसऱ्या बाजूने युक्रेन युद्धामुळे रशियावरही आर्थिक निर्बंध लादले गेले आहेत. त्याचा परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर बऱ्याच प्रमाणात झाला आहे. अशा स्थितीतही आपल्याकडील इंधन, ऊर्जा, शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान यांचा पुरवठा द. आफ्रिका, आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांना करुन आपली अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न रशिया करीत आहे. युद्ध बराच काळ लांबल्याने रशियाने देशांतर्गत शस्त्रास्त्र निर्मिती जरी वाढविली असली तरी दीर्घकालीन युद्धासाठी ती पुरेशी नाही. युद्ध निर्बंधामुळे एरवी इतर देशांकडून रशियास होणारा शस्त्र पुरवठा खंडीत झाला आहे. मित्र असूनही प्राप्त जागतिक परिस्थितीत उघडपणे रशियास शस्त्र सामुग्री पुरवठा करण्यास चीन असमर्थ आहे. छुप्या मार्गाने होणारा चीनचा शस्त्रपुरवठा रशियाच्या गरजा पूर्ण करु शकत नाही.

उत्तर कोरियाकडे गोळीबारासाठीची काडतुसे, छोटी व मध्यम स्फोटके, रॉकेट्स यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. युक्रेन युद्धात वापरात असलेल्या रशियन बनावटीच्या अशाच शस्त्रास्त्रांची तो बरोबरी करणारा आहे. शिवाय या शस्त्रास्त्रांची उ. कोरियाची उत्पादन क्षमताही उल्लेखनीय आहे. हे सारे प्राप्त करुन युक्रेन युद्ध अधिक सक्षमतेने लढण्यासाठी पुतिन उत्तर कोरियात आपल्या संरक्षण व परराष्ट्र मंत्र्यासह दाखल झाले होते. बुधवारी उ. कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या सुनान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतिन यांचे आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी किम जोंग स्वत: विमानतळावर पोहचले होते. लाल गालिचा, गुलाब, हात हालवून अभिवादन करणारे लोक असे पुतिन यांचे शानदार स्वागत करण्यात आले. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधावर मात करण्यासाठी दोन्ही देश परस्परांशी सहकार्य करतील, असे म्हणत पुतिन यांनी युक्रेन युद्धासाठी रशियास पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले.

रशिया आणि उ. कोरिया व्यापार आणि देवाण-घेवाणीचे धोरण विकसित करतील. जे पाश्चात्य देशांपासून स्वतंत्र असेल. संयुक्तपणे दोन्ही देश एकतर्फी निर्बधांना विरोध करतील, असे प्रतिपादनही पुतिन यांनी केले. प्राथमिक भेटीत उभयतांनी दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक आणि व्यापारी संबंध दृढ करण्यावर भर दिला. मात्र शस्त्रास्त्रांची देवाण-घेवाणीबाबत उभयतात करार होत असल्याच्या आरोपांचा इन्कार केला. या प्रसंगी लष्करी संबंध वाढविणे आणि संयुक्त लष्करी कवायती करण्याचा निर्धार पुतिन व किम जेंग यांनी जाहीर केला. रशियासाठी शस्त्रास्त्रे आणि बदल्यात उ. कोरियास इंधन, अण्वस्त्र तंत्रज्ञान, पैसा, हेरगीरीविषयक तंत्रज्ञान हे वाटाघातीतील प्रमुख मुद्दे होते. हे सत्य दोन्हीकडच्या गरजा पाहता लपून राहिलेले नाही.रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि उ. कोरियाचे नेते किम जोंग यांच्या भेटीचे आणि वाटाघाटीचे संभाव्य परिणाम यांचाही यानिमित्ताने उहापोह होणे गरजेचे आहे. उ. कोरियाकडून जर अपेक्षेप्रमाणे शस्त्रास्त्र पुरवठा झाला तर सुरु असलेले युक्रेन युद्ध अधिक विध्वंसकारी होण्याची शक्यता आहे. उ. कोरिया व रशिया दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यामुळे युद्धास वेगळेच अघटीत वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. पुतिन-किम जोंग युतीने अमेरिका आणि तिच्या दोस्त राष्ट्रांच्या चिंता वाढविल्या आहेत. अमेरिका द. कोरियाचा पाठिराखा देश आहे. दोन्ही देश उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे बनविण्याच्या कार्यक्रमास आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.

-अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.