खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात
दोघेजण फरार, खवले मांजर प्राणी संग्रहालयात सोडणार
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यातील लोंढा वनक्षेत्रातील मोहीशेत या ठिकाणी खवल्या मांजराची तस्करी करून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना लोंढा वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. तस्करी करणारे आणखी दोघेजण फरार झाले आहेत. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. खवले मांजर बेळगाव प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता निंबरगी यांनी सांगितले की, लोंढा वनविभागातील मोहीशेत या ठिकाणी चौघेजण भाजी विक्रीचा बहाणा करून जिवंत खवले मांजर विकण्याच्या तयारीत होते. याचा सुगावा लोंढा वनविभागातील कर्मचाऱ्यांना लागताच याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लोंढा विभागाचे वनाधिकारी तेज वाय. पी. यांनी तातडीने विभागीय अधिकारी सुनीता निंबरगी यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे मोहीशेत या ठिकाणी धाड टाकून जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. या कारवाईवेळी दोघेजण फरार झाले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनीता निंबरगी म्हणाल्या, विक्री करणारे हे संशयित गुन्हेगार हल्याळ परिसरातील आहेत. त्यांनी हे खवले मांजर विक्रीसाठी आणले होते. भाज्यांच्या खाली खवले मांजर ठेऊन भाजीविक्री करत असल्याचे भासवत होते. लोंढा विभागाचे डेप्युटी आरएफओ राजू पवार यांना याबाबतची माहिती मिळाली होती. वन कर्मचाऱ्यांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ जिवंत खवले मांजर सापडले. या कारवाईवेळी दोघेजण फरार झाले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींसह खवले मांजराला खानापूर वन कार्यालयात आणण्यात आले. याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे. खवले मांजरासह इतर वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा यात हात असल्याचा संशय सुनीता निंबरगी यांनी व्यक्त केला आहे. हे खवले मांजर पाच ते सहा वर्षांचे आहे. याचे वजन 6 किलो आहे. खवले मांजराच्या अवयवांचा व त्याच्यावरील खवल्यांचा औषधासाठी वापर करण्यात येतो. चीन देशात अशा वन्यप्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अशी तस्करी करणारे रॅकेट सर्वत्र कार्यरत आहेत. या तस्करीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. खवले मांजराला बेळगाव येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.