भाजप-निजदच्या दोन समन्वय समित्या
प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची माहिती : केंद्रीय मंत्री कुमारस्वामींची भेट घेऊन चर्चा
बेंगळूर : राज्य भाजप आणि निजद पक्षांच्या दोन समन्वय समित्या स्थापन करण्याचा विचार आहे. पक्षातील नेत्यांशी चर्चा करून समितीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली. केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी तसेच त्यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांची मंगळवारी भेट देऊन विजयेंद्र यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र यांनी, राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. आठ-दहा दिवसांत कुमारस्वामी भाजप-निजदच्या समन्वय समित्यांसाठी नावे पाठवतील, असे सांगितले. भाजप-निजद समन्वय समिती स्थापनेबाबत मी कुमारस्वामी यांच्याकडे सल्ला मागितला आहे.
येत्या काही दिवसांत ग्रेटर बेंगळूर नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. बेंगळूरपुरती मर्यादित आणि राज्यस्तरावर आणखी एक समन्वय समिती स्थापन करण्याचा सल्ला कुमारस्वामींनी दिला आहे, अशी माहितीही विजयेंद्र यांनी दिली. राज्य सरकार व मंत्री अहंकाराने वागत आहेत. नागमोहनदास पै, किरण मुझुमदार शाह यांच्यासारख्या ज्येष्ठांनी बेंगळूरविषयी व शहरातील रस्त्यांविषयी सरकारला सल्ले दिले आहेत. मात्र, त्यांना सरकारकडून किंमत दिली जात नाहीत. उलट मंत्र्यांकडून त्यांना अपमानित केले जात आहे. राज्य सरकारला ही बाब शोभनीय नाही. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना देखील अशा टीका झाल्या होत्या, सल्ले देण्यात आले होते. तेव्हा येडियुराप्पांनी नागमोहनदास पै यांना घरी बोलावून त्यांचा पाहुणचार केला. त्यांचे सल्ले जाणून घेतले होते, असे ते म्हणाले.