For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस मेळावा राडा प्रकरणी दोन कॉन्स्टेबल निलंबित

01:25 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस मेळावा राडा प्रकरणी दोन कॉन्स्टेबल निलंबित
Advertisement

आयजीपी चेतनसिंग राठोड यांची कारवाई

Advertisement

बेळगाव : सीपीएड मैदानावर आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणावेळी काळे ध्वज दाखविण्यासह घोषणाबाजी केल्याने मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलीस आयुक्त चेतनसिंग राठोड यांनी दोन पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी केली जात असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. बी. ए. नावकोडी (खडेबाजार पोलीस स्थानक), मल्लाप्पा हडगीनाळ (कॅम्प पोलीस स्थानक) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलची नावे आहेत.

संविधान बचाव आणि दरवाढी विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सीपीएड मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांची, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची घटना घडेल का? याची गुप्त माहिती संग्रहित करण्याची जबाबदारी वरील दोघांवर होती. मात्र  सदर माहिती गोळा करण्यात ते अपयशी ठरल्याने काँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करताना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घुसून काळे झेंडे दाखविण्यासह घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घटनेस वरील दोघांना जबाबदार धरण्यात आले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्यात आल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वरील दोघांना निलंबित करण्यात आले आहे. खात्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू

गुप्त माहिती गोळा करण्यात अपयशी ठरण्यासह कर्तव्यात कसूर केल्याने दोन  कॉन्स्टेबलवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? याबाबतही चौकशी सुरू आहे.

-चेतनसिंग राठोड, आयजीपी तथा प्रभारी पोलीस आयुक्त

Advertisement
Tags :

.