अग्रणी नदीत बैलगाडी उलटून दोन मुले मृत्युमुखी
वडील, आणखी एका मुलाला वाचविण्यात यश
वार्ताहर/अथणी
मंगळवारी सायंकाळी 5 वाजता नागनूर पी.ए गावातील संजू कांबळे हे अग्रणी नदीच्या पलीकडे जाऊन शेतात काम करून आपल्या मुलांसह अग्रणी नदी ओलांडून आपल्या गावी जात असताना बैलगाडी उलटून दोन मुले व एक बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्यात वाहून जात असताना संजू कांबळे व त्यांचा मुलगा वेदांत यांना ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले आहेत. याबाबतची माहिती अशी की, संजू कांबळे, त्यांची मुले शेतात काम करण्यासाठी अग्रणी नदी ओलांडून गेले आणि मुलांसह बैलगाडीतून आपल्या गावी परतताना अग्रणी नदीचे पाणी वाढले तेव्हा त्यांची गाडी वाहून गेली.

दीपक संजू कांबळे (वय 8) आणि गणेश संजू कांबळे (वय 6) हे दोघे नदीत वाहून गेल्यानंतर, अग्रणीच्या काठावरील शेतकरी आणि नागनूर पी.ए. येथील ग्रामस्थांनी नदीत उड्या मारल्या आणि दोन्ही मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोल ठरला. अखेर त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. संबरगी, कल्लोत्ती, नागनूर, तावशी गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांचे वडील संजय सदाशिव कांबळे आणि दुसरे वेदांत संजय कांबळे यांना पाण्यातून बाहेर काढले. या घटनेची माहिती कळताच अथणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उप्पारा, सीपीआय संतोष हलूर, डीएसपी प्रशांत मुन्नोळी घटनास्थळी दाखल झाले. प्रशांत मुन्नोळी आणि महसूल निरीक्षक विनोद कदम यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अग्निशमन केंद्राचे अधिकारी मलिकजान जमादार, सुभाना फिरजादे आणि मल्लाना गौडा यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
वडिलांना अश्रू अनावर
वडील संजू कांबळे यांनी त्यांच्या दोन्ही मृत मुलांना मिठी मारली आणि अश्रू ढाळले. तीन गावांतील ग्रामस्थांनी येऊन संजय कांबळे, त्यांचा मुलगा वेदांत कांबळे, एक बैल आणि एक चारचाकी गाडी पाण्यातून बाहेर काढली आणि त्यांना धोक्यापासून वाचवले. घटनेनंतर शेकडो लोक अग्रणी नदीच्या काठावर आले आणि त्यांनी मदत केली. अग्रणी नदी ओलांडत असताना रस्त्याच्या कडेला सुमारे 20-30 फूट अंतरावर असलेल्या खड्ड्यात एक चारचाकी गाडी उलटली