Crime News Miraj: हत्यारांच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटले, 7 लाखाला घातला गंडा
हत्यारांच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटले, ७ लाखांची रक्कम लुबाडली
मिरज : स्वस्त किराणा धान्याच्या खरेदीसाठी कर्नाटकाकडे जाणाऱ्या मुळशी (पुणे) येथील दोघा व्यापाऱ्यांना बेडग येथे मंगसुळी रस्त्यावर लुटले. शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. पाच जणांच्या टोळीने दोन वाहनातून पाठलाग करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून सात लाख रूपयांची रोख रक्कम लुबाडून नेली. याबाबत लक्ष्मण सिध्दोजी कदम (वय 29) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पाच जणांच्या टोळीपैकी दोघा संशयितांची नांवे निष्पन्न झाली आहेत. लुटारूंच्या शोधासाठी मिरज ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस पथक रवाना झाले आहे.याबाबत माहिती अशी, मुळशी (पुणे) येथील धान्य व्यापारी लक्ष्मण कदम आणि विकास शंकरराव सोनटक्के (वय 35) हे दोघे कर्नाटकातून स्वस्त धान्य खरेदीसाठी पिकअप बुलेरो (एमएच-12-व्हीटी-7848) ने बेडग मार्गे जात होते.
पहाटे चार वाजता बेडगपासून काही अंतरावर मंगसूळी रस्त्यावर पाटील वस्ती येथे ते आले असता मागून बुलेरो (एमएच-10-बीटी-4517) आणि एक स्विफ्ट कार (क्रमांक नाही) अशा दोन वाहनातून पाच इसम पाठलाग करत आले. मंगसूळी रस्त्यावर पाटील वस्ती येथे संबंधीतांनी व्यापाऱ्यांच्या वाहनाची अडवणूक केली. स्वत:ची चारचाकी आडवी लावून संशयीत इसम तलवारी व कोयते घेऊन उतरले.
संबंधीत लुटारूंनी व्यापाऱ्यांना हत्यारांचा धाक दाखवत मारहाण सुरू केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या वाहनावरील पुढील काचा कोयता माऊन फोडल्या. घाबरलेले व्यापारी वाहन जाग्यावरच सोडून शेतातून पळून गेले. यावेळी लुटारूंनी संबंधीत व्यापाऱ्यांच्या वाहनातील सात लाखांची रोकड लंपास केली व आपल्या वाहनांतून पसार झाले.
पहाटेच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नव्हती. व्यापाऱ्यांनी आरडाओरडा करूनही मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे संबंधीत लुटारू पसार झाले. घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी आसपासच्या शेतकरी ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी पोलिस पाटीलांना बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील व हवालदार सचिन जाधव यांनीही तातडीने घटनास्थळी जावून लुटारूंचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तोवर लुटारू पसार झाले होते. याबाबत लक्ष्मण सिध्दोजी कदम यांच्या फिर्यादीनुसार पाच अनोळखी तरूणांविरूध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटारूंपैकी दोघा इसमांची व्यापाऱ्यांना ओळख पटली आहे. पोलिस तक्रारीत दोघांची नांवेही त्यांनी नमुद केली आहेत.
तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन्ही गांवे गुपित ठेवली आहेत. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक अजित सिद यांनी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या. भल्या पहाटे पुण्याच्या व्यापाऱ्यांची लुटमार झाल्याने बेडगसह परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मंगसूळी रस्त्यावर वारंवार लुटमारीच्या व घरफोडीच्या घटना घडत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकातून गुटखा घेऊन येणाऱ्या टेंपो चालकाला पिस्तुलीचा धाक दाखवून अशाच प्रकारे लुटमार झाली होती. लुटारूंची टोळी या मार्गावर चारचाकीतून फिरत असते, हे यापूर्वीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. पुन्हा लुटमारीची पुनरावृत्ती होऊन पुण्यातील व्यापाऱ्यांची लुबाडणूक झाल्याने सराईत गुन्हेगारांकडूनच ही लुटमार होत असल्याचा संशय आहे. त्यानुअषंगाने पोलिस अधिक तपास करीत आहेत.
जीव वाचविण्यासाठी शेतात पळालो
व्यापारी गणेश कदम यांनी सांगितले की, कर्नाटकातील अथणी येथे स्वस्त धान्य मिळत असल्याने आम्ही प्रत्येक महिन्यात धान्य खरेदीसाठी जातो. या महिन्यातही धान्य खरेदीसाठी सात लाखांची रोख रक्कम सोबत घेऊन आम्ही निघालो होतो. मंगसुळी रस्त्यावर लुटारूंनी आमचे वाहन अडविले.
घाबरून गाडी रस्त्याकडेला घेतली. काचांवर तलवारी व कोयते मारून तोडफोड करण्यात आली. आम्ही घाबरून जीव वाचविण्यासाठी शेतातून पळून गेलो, अशी आपबिती व्यापाऱ्यांनी सांगितली. लुटारूंपैकी दोघांची चेहरे ओळखीचे आहेत. आमच्यावर पाळत ठेवूनच लुटमार केली आहे, असे व्यापारी विकास सोनटक्के यांनी सांगितले.
परजिह्यातील वाहनांची रेकी
मंगसूळी रस्त्यावर वर्षभरात सलग दुसऱ्यांदा एकाच प्रकारे लुटमारीची घटना घडली आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या वाहनधारकांना हेरून लुटमारी करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे. मात्र, ही टोळी कर्नाटकातील की महाराष्ट्रातील? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
यापूर्वीच्या लुटमारीत तर चोरट्यांनी पिस्तूलीचा धाक दाखविला होता. त्यामुळे लुटारूंच्या या टोळीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परजिह्यातील वाहनांची रेकी करण्याबरोबर पाठलाग करून लुटमार केला जात असल्याचा संशय असून, तपासकामी मिरज ग्रामीण आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांची पथके रवाना केली आहेत.
लवकरच लुटारूंना जेरबंद करू
लुटमारीच्या घटनेतील दोघा संशयितांना तक्रारदारांनी ओळखले आहेत. त्यानुसार दोघांची नांवेही निष्पन्न झाली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासातून वाहनांचा शोध सुरू आहे. लुटारूंच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. लवकरच या लुटारूंच्या टोळीला जेरबंद केले जाईल. शिवाय लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी मंगसूळी रस्त्यावर गस्ती वाढवली जाईल.